
सोलापूर ः सोलापूर जिल्हा किशोर व महिला खो-खो संघाच्या सराव शिबिरास जुळे सोलापूर येथील वसुंधरा महाविद्यालयाच्या मैदानावर तर पुरुष संघाच्या सराव शिबिराला एच डी प्रशालेच्या मैदानावर सुरवात झाली.
या सराव शिबिरात निवडलेले अंतिम संघ इचलकरंजी (कोल्हापूर) येथे २३ ते २७ मार्च दरम्यान होणाऱ्या राज्य शासनाच्या भाई नेरूरकर खो-खो स्पर्धेत भाग घेणार आहेत. जिल्ह्याचे पुरुष व महिला आणि किशोरी हे तीन संघ या स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत.
या सराव शिबिराचे उद्घाटन स्वामी विवेकानंद प्रशालेचे प्राचार्य अंबादास पांढरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन सचिव ए बी संगवे, सहसचिव मोहन रजपूत, राजाराम शितोळे, खजिनदार श्रीरंग बनसोडे, निवड समिती सदस्य प्रथमेश हिरापुरे, अतुल जाधव, तांत्रिक समिती सचिव उमाकांत गायकवाड, सदस्य अजित शिंदे, शेखलाल शेख, पुंडलिक कलखांबकर, राजशेखर जोडमोटे, आनंद जगताप, यशोदीप आठवले आदी उपस्थित होते. श्रीकृष्ण कोळी यांनी सूत्रसंचालन केले.