
डेरवण यूथ गेम्स
चिपळूण : डेरवण येथे सुरू असलेल्या ११व्या डेरवण यूथ गेम्समधील कबड्डी स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात जिजामाता सांगली आणि शिवतेज सातारा यांनी तर १८ वर्षांखालील गटात अक्षय, चिपळूण व मातोश्री, पुणे या संघांनी अनुक्रमे मुले व मुली गटात विजेतेपद पटकावले.
दोन दिवस चाललेल्या कबड्डी स्पर्धेत दोनही गटात मिळून एकूण ३७ संघांनी सहभाग नोंदवला. उपांत्य फेरीपासून सर्व सामने रंगतदार आणि चुरशीचे झाले. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात जिजामाता, सांगली संघाने ओम स्पोर्ट्स, चिपळूण संघावर विजय मिळवत विजेतेपद पटकावले. तर राजमुद्रा छत्रपती संभाजीनगर संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात शिवतेज, सातारा विरुद्ध महेशदादा लांडगे, पुणे संघातील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. यात शिवतेज संघाने निसटती आघाडी घेत विजेतेपद पटकावले. बारामतीच्या शारदा स्पोर्ट्स संघाला द्वितीय क्रमांक मिळाला.
१८ वर्षांखालील मुलांच्या गटात बलाढ्य अक्षय, चिपळूण संघाने रोहा, रायगड संघावर सहज मात करत या वर्षीचे विजेतेपद पटकावले. उपात्य सामन्यात अक्षय संघाकडून पराभूत झालेला केदारनाथ, चिपळूण संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. मुलींच्या गटात मातोश्री, पुणे आणि शिवराज उदय, सातारा यांच्यात अंतिम सामना झाला. मातोश्रीच्या अनुभवी खेळाडूंनी सहज विजय मिळवत विजेतेपद संपादन केले. चिपळूणच्या स्वराज्य स्पोर्ट्स संघाने तिसरे स्थान राखले. चारही गटातील प्रथम तीन क्रमांकांच्या संघांना रोख रक्कम व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
वैयक्तिक पुरस्काराचे मानकरी
उत्कृष्ट चढाई : नैतिक सावंत (ओम स्पोर्ट्स), शर्वरी पाटील (पुणे), आदित्य सिंग (रायगड), ईश्वरी कानडे (सातारा).
उत्कृष्ट बचाव : श्रीप्रसाद खडके (सांगली), सई इंगळे (सातारा), तनिष राणे (चिपळूण), समृद्धी पाटील (पुणे).
अष्टपैलू खेळाडू ः रविराज माने (सांगली), भैरवी इंगळे (सातारा), रितेश बंगाल (चिपळूण), अपेक्षा सावंत (पुणे).