
मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे एका शानदार सोहळ्यात सन्मान
मुंबई ः मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून भारताचा माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि डायना एडुलजी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघातील एक महत्त्वाचा सदस्य असलेल्या दिलीप वेंगसरकर यांनी १० कसोटी आणि १८ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्यांनी एमसीएचे उपाध्यक्ष आणि बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले.
जवळजवळ १७ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या डायना एडुलजी यांनी भारतात महिला क्रिकेटच्या स्थापनेत आणि प्रसारात अग्रणी भूमिका बजावली. क्रिकेट प्रशासनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एमसीएचे माजी उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी आणि प्रवीण बर्वे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय, अजिंक्य रहाणे, यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खान यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.
मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी एमसीए वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे स्वागत केले.