
अहमदाबाद येथे होणार आयोजन
नवी दिल्ली ः भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी बोली लावली आहे. भारतात २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी भारताने बोली लावली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या एका सूत्राने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, खेळांचे आयोजन करण्यास इच्छुक असलेली कागदपत्रे सादर करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च होती.
आयओए आणि गुजरातने बोली लावल्या
सूत्रांनी सांगितले की, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने काही दिवसांपूर्वीच यजमानपदासाठी आवश्यक कागदपत्रे पाठवली आहेत. सूत्राने सांगितले, ‘हो, हे खरे आहे, भारताची बोली आयओए आणि गुजरात राज्याने सादर केली आहे. जर भारताची बोली मान्य झाली आणि देशाला यजमानपद मिळाले तर ते अहमदाबाद, गुजरात येथे आयोजित केले जाईल.
२०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा
अलीकडेच, क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले होते की देशाला या खेळांचे आयोजन करण्यास रस आहे. भारताने शेवटचे २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते आणि २०३६ च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्याचेही उद्दिष्ट आहे.