
ज्युडिशियल महिला संघ आठ विकेटने विजयी, सायली लोणकर सामनावीर
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए वरिष्ठ महिला एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर लीग सामन्यात ज्युडिशियल महिला संघाने छत्रपती संभाजीनगर महिला संघावर आठ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. सायली लोणकर ही सामनावीर ठरली.
भोसरी येथील गॅऱी कर्स्टन अकादमी मैदानावर हा सामना झाला. छत्रपती संभाजीनगर महिला संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर महिला संघ २७.४ षटकात अवघ्या ७९ धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर ज्युडिशियल महिला संघाने अवघ्या ८.१ षटकात दोन बाद ८२ धावा फटकावत आठ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. छत्रपती संभाजीनगर महिला संघाचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे.
कमी धावसंख्येच्या या लढतीत पूनम खेमनार हिने २४ चेंडूत ४९ धावांची आक्रमक खेळी केली. तिने दोन उत्तुंग षटकार व आठ चौकार मारले. यशोदा घोगरे हिने दोन षटकारांसह २७ धावांचे योगदान दिले. माधुरी अघाव हिने दोन चौकारांसह १३ धावा काढल्या. गोलंदाजीत सायली लोणकर हिने ११ धावांत तीन गडी टिपून छत्रपती संभाजीनगर महिला संघाची दाणादाण उडवून दिली. प्रज्ञा वीरकर हिने १८ धावांत दोन गडी बाद केले. प्रियंका कुंभार हिने ७ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः छत्रपती संभाजीनगर महिला संघ ः २७.४ षटकात सर्वबाद ७९ (जिया सिंग ५, माधुरी अघाव १३, यशोदा घोगरे २७, काव्या गुळवे ८, राशी मगर नाबाद ८, इतर १५, सायली लोणकर ३-११, प्रज्ञा वीरकर २-१८, प्रियंका कुंभार २-७, एकता १-१६, अश्विका सिनाळकर १-१८) पराभूत विरुद्ध ज्युडिशियल महिला संघ ः ८.१ षटकात दोन बाद ८२ (गौतमी नाईक ९, अस्मी कुलकर्णी नाबाद ११, पुनम खेमनार ४९, हर्षदा सातव नाबाद १, इतर १२, यशोदा घोगरे १-३६, अक्षरा डांगे १-१३). सामनावीर ःसायली लोणकर.