
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत पटकावले कांस्य पदक
छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महिला बुद्धिबळ संघाने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य पदक जिंकून एक नवा इतिहास लिहिला आहे. विद्यापीठाच्या क्रीडा इतिहासात पहिल्यांदा विद्यापीठाचा महिला संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पातळीवर कांस्य पदकाचा मानकरी ठरला आहे.
विद्यापीठाच्या महिला बुद्धिबळ संघाने पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली होती. या सुवर्ण यशामुळे विद्यापीठाचा महिला बुद्धिबळ संघ हा अखिल भारतीय स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून उत्कृष्ट सोळा विद्यापीठ संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा एकूण पाच फेरीत घेण्यात आली.
विद्यापीठाच्या महिला संघाचा पहिला सामना पंजाब विद्यापीठ सोबत झाला. त्यात विद्यापीठाने ४-० असा एकतर्फी विजय मिळवत पदकाकडे वाटचाल केली. तर दुसऱ्या फेरीत दिल्ली युनिव्हर्सिटीचा ४-० असा पराभव करुन आगेकूच कायम ठेवली.तिसऱ्या फेरीत बलाढ्य मद्रास विद्यापीठ संघाशी सामना झाला. मद्रास विद्यापीठ संघ हा विजेतेपदाचा दावेदार संघ होता. या संघात वूमन ग्रँडमास्टर वैशाली, ग्रँडमास्टर रक्षिता व सविता असे दिग्गज असताना देखील छत्रपती संभाजीनगरच्या विद्यापीठाच्या संघाने मद्रास संघाला २-२ असे बरोबरीत रोखले व स्पर्धेमध्ये सुरस निर्माण केली.
चौथ्या फेरीमध्ये अडमास विद्यापीठ कोलकाता यांच्याकडून विद्यापीठ संघाला १-३ असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने खचून न जाता अंतिम फेरीत मुंबई विद्यापीठाचा ३.५-०.५ असा पराभव करत कांस्य पदकावर आपले नाव कोरले.
विद्यापीठ महिला बुद्धिबळ संघात संस्कृती वानखडे, भाग्यश्री पाटील, सानिया तडवी, तनिषा बोरामणीकर, साचल बिहाणी, संघमित्रा बदाडे आदींचा समावेश होता. या संघाला प्रशिक्षक विलास राजपूत, डॉ निलेश गाडेकर, डॉ विनय हातोले यांचे मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून सीए रेणुका देशपांडे यांनी काम पाहिले.
या शानदार यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ विजय फुलारी, प्र-कुलगुरु डॉ वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप, विद्यापीठाचे प्रशिक्षक मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, किरण शूरकांबळे, अभिजीतसिंग दिक्कत, गणेश कड, डॉ रामेश्वर विधाते, मोहन वहीलवार आदींनी विजयी खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन केले.