
ईश्वरी सावकार, खुशी मुल्ला, भाविका अहिरेची लक्षवेधक कामगिरी
गुवाहाटी ः बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या २३ वर्षांखालील महिला एकदिवसीय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने दिल्ली महिला संघावर सात विकेट राखून दणदणीत विजय साकारत उपांत्य फेरी गाठली आहे. ईश्वरी सावकार (७९), खुशी मुल्ला (४१ धावा व ४ विकेट) आणि भाविका अहिरे (नाबाद ६२) यांची लक्षवेधक कामगिरी निर्णायक ठरली.
फुलुंग येथील एसीए क्रिकेट अकादमी मैदानावर महाराष्ट्र आणि दिल्ली यांच्यातील उपांत्यपूर्व सामना झाला. दिल्ली महिला संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात नऊ बाद २३६ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना महाराष्ट्र महिला संघाने ४४.२ षटकात तीन बाद २३८ धावा फटकावत आठ विकेट राखून सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दिल्ली महिला संघाकडून तनिषा सिंग (५८) व श्वेता सेहरावत (५९) यांनी आक्रमक अर्धशतके ठोकत डावाला आकार दिला. श्वेता सेहरावत हिने दोन षटकरा व तीन चौकार मारले. तनिषा सिंग हिने सात चौकार मारले. सलामीवीर प्रज्ञा रावत हिने पाच चौकारांसह ४० धावांची दमदार खेळी केली. उपासना यादव १३ धावावंर बाद झाली. पूर्वा हिने एक षटकार व दोन चौकार ठोकत ३२ धावांचे योगदान दिले.
महाराष्ट्र महिला संघाकडून खुशी मुल्ला हिने ५२ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. खुशी मुल्ला हिने प्रभावी गोलंदाजी केली. इशिता खळे हिने २९ धावांत दोन बळी घेत तिला सुरेख साथ दिली. ईशा पठारे हिने ३५ धावांत एक गडी बाद केला.

महाराष्ट्र महिला संघासमोर विजयासाठी २३७ धावांचे आव्हान होते. ईश्वरी अवसरे व खुशी मुल्ला या सलामी जोडीने ६८ धावांची भागीदारी करुन संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. ईश्वरी आवासरे हिने ४९ चेंडूत ३६ धावा फटकावल्या. तिने दोन उत्तुंग षटकार व दोन चौकार मारले. खुशी मुल्ला हिने ४३ चेंडूत ४१ धावांची वेगवान खेळी केली. तिने सहा चौकार मारले. गोलंदाजीत चमकदार कामगिरी केल्यानंतर खुशी मुल्ला हिने फलंदाजीत देखील मैदान गाजवले.
सलामी जोडी बाद झाल्यानंतर ईश्वरी सावकार व भाविका अहिरे या जोडीने तिसऱया विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी करुन संघाचा विजय निश्चित केला. विजयासाठी १२ धावांची आवश्यकता असताना ईश्वरी सावकार ७९ धावांची शानदार खेळी करुन बाद झाली. तिने आठ चौकार मारले. या भागीदारीने सामन्यावर महाराष्ट्र संघाने वर्चस्व गाजवले. भाविका अहिरे हिने ८३ चेंडूत नाबाद ६२ धावांची दमदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिने सहा चौकार मारले. आयशा शेख हिने तीन चेंडूत तीन खणखणीत चौकार ठोकत नाबाद १२ धावांसह संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दिल्ली महिला संघाकडून एकता भदाना हिने ४३ धावांत दोन गडी बाद केले. भारती रावल हिने ४० धावांत एक गडी बाद केला.