
साक्षी शिंदेचे आक्रमक अर्धशतक
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय ट्रॉफी सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत सेक्रेटरी एक्स इलेव्हन संघाने सातारा महिला संघावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय साकारला. या सामन्यात शर्वरी खिलारी हिने सामनावीर किताब संपादन केला.
परंडवाल स्पोर्ट्स क्लब मैदानावर हा सामना झाला. सातारा महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत ३८ षटकात सर्वबाद १२९ धावसंख्या उभारली. सेक्रेटरी एक्स इलेव्हन संघाने २०.१ षटकात एक बाद १३३ धावा फटकावत नऊ विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात सेक्रेटरी एक्स इलेव्हनकडून साक्षी शिंदे हिने आक्रमक फलंदाजी करत ५७ चेंडूत ५० धावा फटकावत संघाचा विजय सोपा केला. साक्षीने एक उत्तुंग षटकार व सात चौकार मारले. यशश्री राजेदेशमुख हिने ३५ चेंडूत ३६ धावांची वेगवान खेळी केली. तिने सात चौकार मारले. समृद्धी बानवणे हिने ३२ चेंडूत ३१ धावा काढल्या. तिने सहा चौकार मारले.
गोलंदाजीत शर्वरी खिलारी हिने २७ धावांत तीन विकेट घेतल्या. विभावरी देवकाटे हिने १५ धावांत दोन आणि अनन्या कोकाटे हिने २६ धावांत दोन बळी घेतले.