
- उपांत्य सामन्यात ग्रामीण पोलिस संघावर ८ विकेटने विजय
- दिनकर काळे, सुरज, गौरव शिंदेची लक्षवेधक कामगिरी
छत्रपती संभाजीनगर : लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात डीबीए संघाने ग्रामीण पोलिस संघाचा आठ विकेट राखून पराभव केला. या दणदणीत विजयासह डीबीए संघाने अंतिम फेरी गाठली. दिनकर काळे (५-१४), (सुरज एम (नाबाद ५१) व गौरव शिंदे (नाबाद ५३) यांनी शानदार कामगिरी नोंदवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. ग्रामीण पोलिस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण पोलिस संघाने २० षटकात आठ बाद १३१ धावसंख्या उभारली. सुरज गोंड व विकास नगरकर या सलामी जोडीने संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. सुरज १३ धावांवर बाद झाला. त्याने दोन चौकार मारले. त्यानंतर विकास नगरकर व हिंदुराव देशमुख या जोडीने आक्रमक फलंदाजी करत धावगती वाढवली. हिंदुराव देशमुख २४ चेंडूत ३० धावांची दमदार खेळी करुन बाद झाला. त्याने एक षटकार व तीन चौकार मारले.
विकास नगरकरची आक्रमक खेळी ३८ धावांवर संपुष्टात आली. विकासने ३६ चेंडूत पाच चौकारांसह ३८ धावा काढल्या. विकास बाद झाल्यानंतर लगेचच विशाल नरवडे अवघ्या ३ धावांवर बाद झाला. एका बाजूने विकेट पडत असताना इनायत अली याने १६ चेंडूत २० धावा फटकावल्या. त्याने एक षटकार व दोन चौकार मारले. फेरोज पठाण (३), संजय सपकाळ (१०), कर्णधार संदीप जाधव (नाबाद १) यांनी आपले योगदान दिले. ग्रामीण पोलिस संघाने २० षटकात ८ बाद १३१ धावा काढल्या.
डीबीए संघाकडून दिनकर काळे याने अप्रतिम गोलंदाजी केली. काळे याने अवघ्या १४ धावांत पाच विकेट घेऊन सामन्याचे चित्र बदलून टाकले. हरमीतसिंग रागी याने १६ धावांत दोन विकेट घेऊन त्याला सुरेख साथ दिली. कर्णधार मोहित घाणेकर याने ३१ धावांत एक गडी बाद केला.
डीबीए संघाची खराब सुरुवात
डीबीए संघासमोर विजयासाठी १३२ धावांचे आव्हान होते. डीबीए संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात आक्रमक फलंदाज अजय शितोळे (१) क्लीन बोल्ड बाद झाला. इनायत अली याने पहिला धक्का दिला. त्यानंतर धमाकेदार फलंदाज मुकुल जाजू ८ चेंडूत १४ धावा काढून तंबूत परतला. त्याने एक चौकार व एक षटकार मारला. संजय सपकाळ याने त्याची विकेट घेतली.
मुकुल जाजू दुसऱ्या षटकात बाद झाला तेव्हा डीबीए संघाची स्थिती दोन बाद १७ अशी होती. त्यानंतर सुरज एम आणि गौरव शिंदे या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ११७ धावांची भागीदारी करत संघाला मोठा विजय मिळवून दिला. सुरज याने ४८ चेंडूत नाबाद ५१ धावा फटकावल्या. त्याने एक षटकार व सहा चौकार मारले. गौरव शिंदे याने ३४ चेंडूत नाबाद ५३ धावांची आक्रमक खेळी केली. गौरवने ८ चौकार मारले. सुरज व गौरवची शतकी भागीदारी निर्णायक ठरली.
ग्रामीण पोलिस संघाच्या इनायत अली (१-१८) व संजय सपकाळ (१-२४) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.