
देवगिरी महाविद्यालयात संगीत विभागातर्फे आज आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः मशिप्र मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय संगीत विभाग आयोजित पं नाथराव नेरळकर स्मृती हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन रविवारी (२३ मार्च) सकाळी १० वाजता देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृह येथे करण्यात आले आहे.
भारतीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त पं नाथराव नेरळकर हे प्रख्यात शास्त्रीय गायक आणि संगीत तज्ज्ञ होते. संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान प्रशंसनीय आहे. २०१५ पासून देवगिरी महाविद्यालयाच्या संगीत विभागात ते मानद कलाकार म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. त्यांच्या शास्त्रीय संगीतातील कारकीर्दीचा सन्मान म्हणून देवगिरी महाविद्यालयाने त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम २१ हजार रुपये, द्वितीय १५ हजार रुपये, तृतीय ११ हजार रुपये तसेच स्मृतिचिन्ह अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. सदरील स्पर्धेत वय वर्ष १६ ते २५ या वयोगटातील स्पर्धक सहभागी होणार आहेत.
या राज्यस्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेचे उद्घाटन शहरातील प्रथितयश शास्त्रीय गायक पं विश्वनाथ ओक यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या प्रसंगी देवगिरी महाविद्यालयाच्या विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य पंडितराव हर्षे यांची विशेष प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सदरील राज्यस्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेमध्ये २३ मार्च रोजी स्पर्धकांनी तसेच शहरातील संगीत रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ अपर्णा तावरे, डॉ गणेश मोहिते, संगीत विभाग प्रमुख तथा स्पर्धा समन्वयक प्रा शैलजा कुलकर्णी यांनी केले आहे.