
पुनीत बालन ग्रुप व लोहा फाउंडेशनतर्फे आयोजन
पुणे ः पुनीत बालन ग्रुप आणि लोहा फाउंडेशनतर्फे आयोजित आपला पुणे सायक्लोथॉनच्या चौथ्या हंगामात हजारो सायकलस्वारांसह शारीरिकदृष्ट्या दिव्यांग आणि अनाथ मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या उपक्रमाने समावेशकता आणि सामाजिक ऐक्याचा सशक्त संदेश दिला. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग सायकलस्वारांनी ३ किमी सामाजिक उपक्रम राईड, तर अनाथाश्रमातील मुलांनी १० किमी सायकल राईड पूर्ण केली. त्यांच्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.
पुणे सायक्लोथॉनचे रेस डायरेक्टर आयपीएस कृष्णप्रकाश यांनी या विशेष गटांच्या सहभागाचे कौतुक करताना सांगितले, “सायकलिंग हा फक्त खेळ नसून सामाजिक एकात्मतेचे आणि सक्षमीकरणाचे प्रभावी साधन आहे. दिव्यांग सायकलस्वारांची जिद्द आणि अनाथ मुलांची ऊर्जा पाहून मन भारावले.”
कार्यक्रमादरम्यान आयोजक आणि नागरिकांनी या सायकलस्वारांना मोठ्या उत्साहाने प्रोत्साहन दिले. लोहा फाउंडेशनच्या माध्यमातून समावेशकता, फिटनेस आणि सामाजिक जबाबदारीच्या ध्येयांना बळ मिळाले आहे. पुणे सायक्लोथॉन केवळ सायकल स्पर्धा नसून समाजातील प्रत्येक घटकाला सशक्त करणारा उपक्रम ठरला आहे.