
मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाचा १८ धावांनी पराभव, सुमित आगरे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लिजंड्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात नॉन स्ट्रायकर्स संघाने मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाचा अवघ्या १८ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात सुमित आगरे याने सामनावीर किताब संपादन केला. रमेश साळुंके याची तुफानी शतकी खेळी व्यर्थ ठरली.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नॉन स्ट्रायकर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना धमाकेदार कामगिरी बजावत २० षटकात पाच बाद २३३ अशी भक्कम धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. मीनाक्षी इंडस्ट्रीज संघ २० षटकात सात बाद २१५ धावा काढल्या. त्यांना अवघ्या १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
नॉन स्ट्रायकर्स संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. इरफान पठाण (४) व सिद्धांत पटवर्धन (२) ही सलामी जोडी स्वस्तात बाद झाली. त्यानंतर शेख सादिक देखील १८ धावांची वेगवान खेळी करुन तंबूत परतला. त्याने चार चौकार मारले. त्यावेळी संघाची स्थिती तीन बाद ३६ अशी बिकट होती.

तीन बाद ३६ अशा बिकट स्थितीतून संघाला बाहेर काढताना आसिफ खान याने ७८ धावांची धमाकेदार खेळी साकारली. आसिफ याने ४६ चेंडूंचा सामना करताना सात टोलेजंग षटकार व पाच चौकार ठोकले. सुमित आगरे याने ३४ चेंडूत नाबाद ५२ धावांची दमदार खेळी करत संघाला भक्कम स्थिती मिळवून दिली. सुमित याने तीन उत्तुंग षटकार व चार चौकार मारले. वसीम शेख याने केवळ १९ चेंडूत ५६ धावांची स्फोटक अर्धशतकी खेळी केली. वसीम याने पाच उत्तुंग षटकार व चार चौकार मारले. इतर २३ धावांचा बोनसही मिळाला. या सामन्यात नॉन स्ट्रायकर्स संघाने तब्बल १५ षटकार ठोकत वर्चस्व गाजवले.
मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाकडून रणजित याने ३२ धावांत दोन गडी बाद केले. राजू परचाके (१-३०), पांडुरंग गाजे (१-३९), पंकज हिवाळे (१-२३) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
मीनाक्षी इंडस्ट्रीज संघासमोर विजयासाठी २३४ धावांचे मोठे लक्ष्य होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना मीनाक्षी संघाच्या डावाची सुरुवात खऱाब झाली. डॉ कार्तिक बाकलीवाल (६), डॉ सुनील काळे (१७), संदीप फोके (२) हे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. पांडुरंग गाजे १३ चेंडूत २१ धावांची धमाकेदार खेळी करुन बाद झाला. त्याने चार चौकार मारले. नितीन चव्हाण याने ७ चेंडूत १६ धावा फटकावल्या. त्याने एक षटकार व दोन चौकार मारले.
पाच बाद ६३ अशा बिकट स्थितीत संघ असताना रमेश साळुंके याने वादळी शतक ठोकून सामन्यात रंगत आणली. रमेश साळुंके व विजय अडलाकोंडा या जोडीने पाचव्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी करत नॉन स्ट्रायकर्स संघाचे धाबे दणाणून सोडले. सातव्या षटकात मैदानात उतरलेल्या रमेश साळुंके याची तुफानी खेळी अखेर ११८ धावांवर संपुष्टात आली. रमेशने अवघ्या ५३ चेंडूत ११८ धावांची वादळी शतकी खेळी केली. त्याने तब्बल १० षटकार व ९ चौकार मारत मैदान गाजवले. शेख सादिक याने त्याची विकेट घेऊन मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर लगेचच विजय अडलाकोंडा रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतला. त्याने १७ धावांचे योगदान दिले. कर्णधार मनोज ताजी (२) स्वस्तात बाद झाला. रणजित याने नाबाद ७ धावा काढल्या. २० षटकात मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाने सात बाद २१५ धावा फटकावत सामन्यातील रंगत कायम ठेवली.
परंतु, नॉन स्ट्रायकर्स संघाने १८ धावांनी विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला. शेख सादिक याने ३४ धावांत तीन विकेट घेतल्या. सुमित आगरे याने ४२ धावांत दोन बळी टिपले. गिरीश खत्री याने ३० धावांत एक गडी टिपला.