मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्ज सामना रविवारी रंगणार

  • By admin
  • March 22, 2025
  • 0
  • 3 Views
Spread the love

हैदराबाद येथे सनरायझर्स हैदराबाद-राजस्थान रॉयल्स लढत

चेन्नई ः आयपीएल स्पर्धेच्या नव्या हंगामातील दुसऱया दिवशी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी (२३ मार्च) सामना होणार आहे. आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विजेतेपद या दोन्ही संघांनी पटकावली आहेत. साहजिकच या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतात याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे.

चेन्नई आणि मुंबई संघांमध्ये एक मोठा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यावर सर्वांचे लक्ष आहे कारण एका बाजूला महेंद्रसिंग धोनी असेल आणि दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा आपली जादू दाखवेल. हे दोन्ही संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहेत. चेन्नई आणि मुंबईने प्रत्येकी ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.

हार्दिक पंड्यावर एका सामन्याची बंदी असल्याने सूर्यकुमार यादव मुंबईचे नेतृत्व करणार आहे. दुसरीकडे चेन्नई संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचा धमाकेदार फलंदाज रुतुराज गायकवाड करणार आहे. आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ आतापर्यंत ३७ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यापैकी मुंबईने २० वेळा विजय मिळवला, तर चेन्नई सुपर किंग्जने १७ वेळा सामना जिंकला आहे. चेन्नईने गेल्या ५ सामन्यांमध्ये ४ सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

हैदराबाद विरुद्ध राजस्थान लढत

आयपीएल स्पर्धेत रविवारी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला जाणार आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. सनरायझर्स हैदराबाद हा तोच संघ आहे ज्याने गेल्या हंगामात ३ वेळा २५० धावांचा टप्पा ओलांडला होता आणि आयपीएल २०२४ चा अंतिम सामनाही खेळला होता. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स आहे, जो प्ले ऑफमध्ये पोहोचला होता.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजीसाठी अनुकूल असते. येथे मोठे धावसंख्या उभारण्यात आली आहे आणि गेल्या हंगामात एसआरएच संघाने याच मैदानावर २७७ धावा केल्या होत्या. या मैदानावर झालेली ही आयपीएलचा सर्वोच्च धावसंख्या आहे. आतापर्यंत येथे ७७ आयपीएल सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३४ वेळा विजय मिळवला आहे आणि पाठलाग करणाऱ्या संघाने ४३ वेळा विजय मिळवला आहे.

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स २० वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यापैकी राजस्थानने ९ वेळा आणि हैदराबादने ११ वेळा विजय मिळवला आहे. गेल्या तीन सामन्यांमध्ये राजस्थान एसआरएचकडून सतत पराभूत होत आहे. राजीव गांधी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये पाच सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी चार वेळा एसआरएचने विजय मिळवला आहे. यावेळीही सनरायझर्स हैदराबाद राजस्थानला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवू शकते, असे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *