महाराष्ट्राच्या स्वरुप उन्हाळकरला सुवर्णपदक 

  • By admin
  • March 22, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

खेलो इंडिया पॅरा गेम्स 

नवी दिल्ली : खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या नेमबाजीतील लढतीत महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरने एक दशांश गुणाने सुवर्णपदकावर नाव कोरले. १० मीटर रायफल नेमबाजीतील एस एच १ प्रकारात स्वरूपसोबत कविन केगनाळकरने रूपेरी यश संपादन केले.

डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या नेमबाजीत स्पर्धेतील पहिल्याच अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या डबल धमाका पहाण्यास मिळाला. १० मीटर रायफल नेमबाजीतील एस एच १ प्रकारात पात्रता फेरीत कोल्हापूरचा स्वरूप उन्हाळकर चौथा स्थानावर होता. अंतिम लढतीत अनुभव संपन्न स्वरूप याने १६ व्या फेरीपर्यंत प्रथम स्थानावर आघाडी घेतली होती. १७ व्या फेरीत ९.१ गुणांमुळे तो चौथा स्थानावर  फेकला गेला. तर अनपेक्षितपणे चौथ्या स्थानावर असणारा १५ वर्षींय कविन केगनाळकरने पहिल्या स्थानी मुसंडी मारली.

पदक निश्चित करणार्‍या २०व्या फेरीत स्वरूपने आपल्या लौकिकला साजेसा खेळ करीत पुन्हा आघाडी घेत दुसरे स्थान प्राप्त केले. शेवटच्या २३ व २४ फेरीत सुवर्णपदकासाठी महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकर व कविन केगनाळकरमध्ये कमालीची झुंज दिसून आली. २२४.२ गुणांसह कविन आघाडीवर तर पाईंट १ गुणांनी स्वरूप दुसर्‍या स्थानावर होता. २३व्या फेरीत गुणांची बरोबरी करीत अखेरच्या २४ व्या फेरीत १०.७ गुणांचा अचूक वेध घेत अवघ्या एका गुणांनी स्परूपने बाजी मारली.

कोल्हापूरचा स्वरूप उन्हाळकरने सलग दुसर्‍यांदा खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकाचा करिश्मा घडविला. पॅरिस ऑलिम्पिकपटू असणार्‍या स्वरूप हा स्पर्धेतील प्रमुख दावेदार होता. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममधील कसून सरावामुळे पुन्हा यश हाती आले असे सांगून स्वरूप पुढे म्हणाला की, पॅरीसमधील अपयश मागे टाकून या पदकापासून नवी सुरूवात झाली आहे. आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक पदक हेच माझे स्वप्न आहे.

नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या सोलापूरच्या कविन केगनाळकर याने रौप्य पदकाची लक्षवेधी कामगिरी केली. डावा पाया गुडघ्यापासून नसलेल्या कविनने कृत्रिम पायावर उभा राहत पदकाचा पराक्रम केला. गत स्पर्धेत त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. खेलो इंडिया स्पर्धेसाठी खूप मेहनत केली होती. यामुळे यश लाभले असे कविन याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *