
नवी दिल्ली : खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये बॅडमिंटन स्पर्धेत शनिवारचा दिवस महाराष्ट्रासाठी काहीसा निराशेचा ठरला. यात अंतिम फेरी गाठूनही तीन खेळाडूंना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सुकांत कदम याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. पण अंतिम फेरीत त्याला तामिळनाडूच्या नवीन शिवकुमारकडून १५-२१, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर सुकांत म्हणाला, ‘नवीन याने चांगली तयारी केली होती. माझी तयारी कमी पडली. त्याने माझे कच्चे दुवे हेरून नियोजनबद्ध खेळ केला. त्याने फ्लॅट शॉट मारण्याची युक्ती वापरली. त्याला योग्य प्रत्युत्तर देणे मला जमले नाही. आजचा दिवस त्याचा होता.’
सुकांत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या तर नवीनकुमार सहाव्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत उभय खेळाडू तीनदा आमने-सामने आले. यापैकी नवीन दोनदा तर सुकांत एकदा यशस्वी ठरला आहे. येत्या काळात एशियन चॅम्पियनसाठी तयारी करणार असल्याचे सुकांतने सांगितले.
व्हीलचेअर गटात प्रेमकुमार आले याला उत्तर प्रदेशच्या शशांककुमारने पराभूत केले. ही लढत शशांककुमारने २१-१२, २१-१५ अशी जिंकली.
आरती पाटील पॅरालिम्पिक खेळाडू मनीषा रामदास हिच्याकडून २१-५, २१-४ असा पराभव स्वीकारावा. मनीषाच्या वेगवान आणि अष्टपैलू खेळासमोर २८ वर्षीय आरती पूर्णपणे अपयशी ठरली.