
कोलकाता : आयपीएलच्या १८ व्या हंगामाची रंगारंग कार्यक्रमाने सुरुवात झाली. चित्रपट कलाकारांनी नृत्य-संगीताने आपली जादू पसरवली.
आयपीएलचा उद्घाटन समारंभात केक कापण्यात आला आणि आयपीएल २०२५ चे उद्घाटन आतषबाजीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत गायले गेले. आयपीएलच्या उद्घाटन समारंभाची सुरुवात शाहरुख खानच्या भाषणाने झाली आणि त्यानंतर बॉलिवूड गायिका श्रेया घोषालच्या सादरीकरणाने झाली.

श्रेया घोषाल हिने तिच्या सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने तिच्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर पंजाबी गायक करण औजला यांनी कार्यक्रमात रंगत आणली. शेवटी शाहरुखने रिंकू सिंग आणि विराट कोहलीसोबत नाच केला. गतविजेत्या केकेआर संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार हे चमकदार आयपीएल ट्रॉफीसह मंचावर आले. शाहरुखसोबत स्टेजवर बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी, दिशा पटानी, श्रेया घोषाल, करण औजला, रहाणे आणि पाटीदार होते.

कोहलीने शाहरुखसोबत नृत्य
उद्घाटन समारंभात विराट कोहलीने शाहरुखसोबत ‘झूमे जो पठाण’ गाण्यावर नृत्य केले. शाहरुखने कोहलीला नाचण्याचे आवाहन केले आणि दोघांनीही पठाण चित्रपटातील गाण्यावर नाच करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर शाहरुखने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना आणि कलाकारांना स्टेजवर बोलावले. आयपीएलच्या १८ हंगामांच्या पूर्ततेबद्दल बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी विराट कोहलीला स्मृतिचिन्ह भेट दिले. उद्घाटन समारंभाच्या शेवटी, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे ट्रॉफी घेऊन मंचावर आले.