
विराट कोहली, फिलिप सॉल्टचे धमाकेदार अर्धशतके, कृणाल पंड्याची प्रभावी गोलंदाजी
कोलकाता : आयपीएल इतिहासात तब्बल १८ वर्षांनंतर पहिल्या सामन्यात आमने-सामने आलेल्या आरसीबी संघाने गतविजेत्या केकेआर संघावर सात विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. विराट कोहली, फिलिप सॉल्ट, कृणाल पंड्या हे आरसीबी संघाच्या विजयाचे हिरो ठरले. आरसीबीने १६.१ षटकात तीन बाद १७७ धावा फटकावत शानदार विजय साकारला.

आरसीबी संघासमोर विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य होते. या धावसंख्येचा पाठलाग सुरू करताना फिलिप सॉल्ट व विराट कोहली याने धमाकेदार सुरुवात केली. सॉल्ट व कोहली जोडीने ९५ धावांची दमदार भागीदारी केली. नवव्या षटकात वरुण चक्रवर्ती याने सॉल्ट याला ५६ धावांवर बाद करुन संघाला पहिले यश मिळवून दिले. सॉल्ट याने ३१ चेंडूंचा सामना करताना दोन उत्तुंग षटकार व नऊ चौकार मारले.
सॉल्ट बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल देखील लवकर बाद झाला. त्याने केवळ १० धावांचे योगदान दिले. त्यानंतर अनुभवी विराट कोहली याने ३० चेंडूत अर्धशतक साजरे करत संघाची स्थिती अधिक भक्कम केली. कोहली व कर्णधार रजत पाटीदार जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची वेगवान भागीदारी करुन संघाचा विजय निश्चित केला. पाटीदारने अवघ्या १६ चेंडूत ३४ धावांची वेगवान खेळी केली. त्याने पाच चौकार व एक षटकार मारला.
विराट कोहली याने ३६ चेंडूत नाबाद ५९ धावांची बहारदार अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कोहलीने तीन टोलेजंग षटकार व चार चौकार मारले. लिव्हिंगस्टोन याने केवळ ५ चेंडूंचा सामना करताना नाबाद १५ धावा फटकावल्या. त्याने एक षटकार व दोन चौकार मारले. त्यानेच विजयी चौकार ठोकला. आरसीबी संघाने १६.२ षटकात तीन बाद १७७ धावा फटकावत विजयी सलामी दिली. केकेआर संघाकडून वैभव अरोरा (१-४२), वरुण चक्रवर्ती (१-४३) व सुनील नरेन (१-२७) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

केकेआर ८ बाद १७४
कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १७४ धावसंख्या उभारली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायण यांनी १०३ धावांची शानदार भागीदारी करत केकेआर संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण कृणाल पंड्याने ३ विकेट्स घेत आरसीबीला जोरदार पुनरागमन मिळवून दिले आणि केकेआरला १७४ धावांवर रोखले. केकेआर संघाने धमाकेदार सुरुवात केली होती. परंतु, त्यांच्या दमदार सुरुवातीपेक्षा कमीत कमी ३०-४० धावा कमी केल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या १० षटकांत १०७ धावा केल्या. पण शेवटच्या १० षटकांत आरसीबीच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. केकेआर संघाला शेवटच्या १० षटकांत फक्त ६७ धावा करता आल्या, याचे श्रेय आरसीबीच्या फिरकीपटूंना आणि विशेषतः कृणाल पंड्या याला जाते. कृणालने कर्णधार रहाणेसह ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. रहाणे बाद झाला तेव्हा केकेआरचा स्कोअर १०.३ षटकांत १०९ धावा होता. फिनिशर्स चांगली कामगिरी करतील आणि धावसंख्या २०० च्या पुढे जाईल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही.
व्यंकटेश अय्यर (६), रिंकू सिंग (१२) आणि आंद्रे रसेल (४) सारखे स्फोटक फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. अंगकृष रघुवंशीने २२ चेंडूत १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ३० धावा केल्या.
रहाणे आणि नरेन यांच्यात शतकी भागीदारी
क्विंटन डी कॉकची पहिली विकेट ४ धावांवर पडल्यानंतर, अजिंक्य रहाणेने सुनील नारायणसह शानदार शतकी भागीदारी केली. रहाणेने आयपीएल २०२५ मधील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने फक्त २५ चेंडू खेळले. रहाणेने ३१ चेंडूत ५६ धावा केल्या. त्यामध्ये त्याने ६ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याला कृणाल पंड्याने बाद केले. सुनील नारायणने २६ चेंडूत ४४ धावा केल्या. या खेळीत त्याने ३ षटकार आणि ५ चौकार मारले. त्याला रसिक सलाम याने बाद केले.
कृणालने ३, हेझलवूडने २ विकेट घेतल्या.
कृणाल पंड्याने ४ षटकांत २९ धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेतले. त्याने अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर आणि रिंकू सिंग यांना आपले बळी बनवले. जोश हेझलवूडने क्विंटन डी कॉकच्या रूपात डावातील पहिली विकेट घेतली. त्याने ४ षटकांच्या स्पेलमध्ये २२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. यश दयाल आणि रसिक सलाम यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. सुयश शर्मानेही १ विकेट घेतली.
१८ वर्षांनंतर पहिल्यांदाच आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात केकेआर आणि आरसीबी आमनेसामने आले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स आतापर्यंत एकूण ३४ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. केकेआर संघ २० वेळा विजयी झाला आहे, तर दुसरीकडे आरसीबीचा संघ १४ वेळा विजयी झाला आहे. गेल्या ४ सामन्यांमध्ये केकेआर आरसीबीवर सतत विजय मिळवत आहे.