
जळगाव ः नवी दिल्ली येथे झालेल्या ५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेच्या आंतर संस्था सांघिक विजेतेपद गटात जैन इरिगेशनच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी दैदिप्यमान अशी कामगिरी करताना दोन्ही गटात विजेतेपद पटकाविले.
नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने अंतिम सामन्यात रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या संघाचा ३-० असा तर महिला संघाने बलाढ्य अशा पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड संघावर २-१ अशा फरकाने विजय प्राप्त केला आणि विजेतेपद पटकावले.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनच्या दोन्ही संघांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक अतुल जैन, प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे व इतर सर्व सहकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
जैन इरिगेशनचे संघामध्ये पुरुष संघात संदीप दिवे (कर्णधार), अनिल मुंडे, अभिजीत त्रीपणकर, जैद अहमद, रहीम खान व नईम अन्सारी यांचा समावेश आहे. महिला संघात आयशा खान (कर्णधार), मिताली पाठक, प्राजक्ता नारायणकर, समृद्धी धडेगावकर, पुष्करणी भट्टड व श्रुती सोनवणे यांचा समावेश होता. दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक सय्यद मोहसिन हे होते.
पुरुष सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या जैद अहमदने विश्वविजेता खेळाडू व याच स्पर्धेतील पुरुष एकेरी गटातील विजयी खेळाडू प्रशांत मोरे याचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात संदीप दिवेने रिझर्व बँकेच्या व्ही आकाश याचा चुरशीच्या सामन्यात २-१ ने पराभव करून तसेच दुहेरीच्या सामन्यातही जैन इरिगेशनच्या अनिल मुंडे व अभिजीत त्रीपणकर यांनी रिझर्व बँकेच्या जहीर पाशा व एल सूर्यप्रकाश यांचा २-१ ने पराभव करून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
महिला सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात पहिल्या एकेरीच्या सामन्यात जैन इरिगेशनची समृद्धी घडीगावकर ही पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या सध्याची विश्वविजेती खेळाडू एम. खजिमा हिच्याविरुद्ध झिरो – दोन सेट ने पराभूत झाली. एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात मात्र जैन इरिगेशनच्या मिताली पाठक हिने उत्कृष्ट अशा खेळाचे प्रदर्शन करीत माजी विश्वविजेती व सदर स्पर्धेतील एकेरीतील अग्रमानांकित खेळाडू रश्मी कुमारी हिचा २-० ने पराभव करून आपल्या संघाला १-१ अशी बरोबरी करून दिली.
दुहेरीच्या निर्णयाक सामन्यात जैन इरिगेशनच्या अनुभवी खेळाडू आयशा खान व नवख्या श्रुती सोनवणे यांनी पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या एस इलावजकी व व्ही मित्रा या जोडीवर २-१ ने विजय प्राप्त करून आपल्या संघाला विजेतेपद मिळून दिले.
तत्पूर्वी, उपांत्य सामन्यात जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने सिव्हिल सर्व्हिसेस संघावर ३-० ने तसेच महिला संघाने भारतीय जीवन बीमा निगम संघावर दोन एकने पराभव करून आपल्या संघाला अंतिम फेरी गाठून दिली होती.
पुरुष एकेरी गटात जैन इरिगेशनच्या खेळाडूंचे वर्चस्व
या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात अंतिम चौघात जैन इरिगेशनच्या तब्बल तीन खेळाडूंनी प्रवेश करून आपले वर्चस्व सिद्ध केले. या गटात जैन इरिगेशनच्या संदीप दिवेने उपविजेतेपद तसेच अभिजीत त्रिपणकर व जैद अहमद यांनी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावून येत्या जुलै महिन्यात सिंगापूर येथे होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धा आणि ऑक्टोबर महिन्यात दुबई येथे होणाऱ्या विश्वकप स्पर्धेकरिता भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. महिला एकेरी गटात जैन इरिगेशनच्या समृद्धी घडीगावकर हिने सातवे स्थान प्राप्त केले.