
आमदार निधीचे वाटोळे, सखोल चौकशीची मागणी
नांदेड : भारतासह जगभरात ऑलिम्पिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या व सर्व खेळांची जननी संबोधल्या जाणाऱ्या जिम्नॅस्टिक खेळाच्या हॉलच्या नावाखाली दहा बाय बाराची खोली बांधून तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा अधिकारी यांनी संगणमताने माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या निधीचे वाटोळे केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी युवक व क्रीडा विभागचे प्रदेश सरचिटणीस प्रा जयपाल संभाजी रेड्डी यांनी केली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, सिडको येथील शासनाच्या वतीने बांधकाम करण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे दोन वेळेस उद्घाटन करण्यात आले आहे. त्याच परिसरातील जागेत माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या आमदार निधीतून सात लक्ष रुपयाचा निधी घेऊन दहा बाय बारा आकाराच्या खोलीचे बांधकाम करण्यात आले आणि त्याला जिम्नॅस्टिक हॉलचे नाव देण्यात आले.
सद्यस्थितीत बांधकाम झाल्यापासून सदरील खोली बंद अवस्थेत असून त्यात किरकोळ भंगार व निरुपयोगी सामान ठेवण्यात आले आहे. तो परिसर वापरात नसल्याकारणाने त्या ठिकाणी व त्या परिसरात युवक दारू, पत्ते, नशाबाजीसाठी परिसराचा वापर करत आहेत.
जगात जिम्नॅस्टिक हॉलची लांबी रुंदी किमान ५ हजार स्क्वेअर फिट असणे महत्त्वाचे आहे. पण आमदार महोदयांची दिशाभूल करून यात कोणी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे हा संशोधनाचा विषय आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने घरकुल योजनेसाठी किमान अडीच लाख निधी मंजूर करण्यात येतो किमान दोन रूम संडास बाथरूम त्या निधीत करण्यात येतो. पण सदरील जिम्नॅस्टिक हॉलच्या नावाखाली दहा बाय बारा रूमचे बांधकाम करण्याची परवानगी तथा प्रशासकीय मान्यता दिली आहे तसेच तत्कालीन आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या निधीवर जाणीवपूर्वक डल्ला मारला आहे अशा दोषी अधिकाऱ्याची योग्य ती चौकशी करून दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. सदर प्रकरणात नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून दोषी अधिकार्यावर कारवाई करावी करतील अशी अपेक्षा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी युवक व क्रीडा विभागचे प्रदेश सरचिटणीस प्रा जयपाल संभाजी रेड्डी यांनी व्यक्त केली आहे.