
पुणे ः महाराष्ट्र राज्य पोलिस बॉक्सिंग स्पर्धेत पुणे शहरातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावत वर्चस्व गाजवले.
गेल्या काही वर्षांत एकूणच बॉक्सिंग या खेळात येणाऱ्या नव्या पिढीचा व खासकरुन त्यांच्या पालकांचा दृष्टीकोन बदलला आहे. मेरी कोम, विजेंदरसिंग किंवा अखिलकुमार यांच्या यशासह मीडियात बॉक्सरचे होणारे कौतुक पाहून सध्याची पिढी प्रेरित होऊन या खेळात वळत आहे.
ठाणे येथे महाराष्ट्र राज्य पोलिस बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये पुणे शहराच्या माध्यमातून भरती झालेल्या खेळाडूंनी बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्णपदक पटकाविले. किरण पवार, ऋषिकेश रणदिवे, अनिकेत कांबळे यांनी आपल्या शानदार कामगिरीतून सुवर्णपदकावर मोहोर उमटविली.
महाराष्ट्र पोलिस गेम्स स्पर्धेमध्ये पोलिस दलाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून तिन्ही खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवले. या शानदार कामगिरीमुळे हे तिघे बॉक्सर पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलिस दलाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
पुणे शहर बॉक्सिंग संघटना व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान यांच्यावतीने पुणे बॉक्सिंग शहर संघटनेचे अध्यक्ष अविनाश बागवे यांच्या हस्ते तिन्ही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मातंग एकता आंदोलन पुणे शहर उपाध्यक्ष दयानंद आडगळे, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष सुरेशकुमार गायकवाड, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष अशोक मेमजादे, कार्याध्यक्ष मदन वाणी, सचिव विजय गुजर यावेळी उपस्थित होते. संघटनेचे सर्व सदस्य आणि पुणे शहरातील बॉक्सिंग खेळाडू, पालक उपस्थित होते. यावेळी अविनाश बागवे यांनी खेळाडूंशी संवाद साधला. यावेळेस या सर्वांनी सर्व खेळाडूंना पुढील अखिल भारतीय पोलिस बॉक्सिंग स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.