
परवीन खानची आंतरराष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगरच्या राष्ट्रीय महिला जलतरण साक्षरता मिशनच्या प्रमुख कार्यकर्त्या तसेच महिला फिटनेस व जीम ट्रेनर परवीन खान यांनी नुकत्याच ओडिशा राज्यातील राऊरकेला येथे पार पडलेल्या सातव्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स मध्ये आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत मैदानी क्रीडा प्रकारात तीन पदकांची कमाई केली.
राऊरकेला येथील बिरसा मुंडा आंतराष्ट्रीय मैदानावर ही स्पर्धा संपन्न झाली. या मास्टर्स राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या महिला ॲथलीट परवीन खान यांनी हॅमर थ्रो प्रकारात सुवर्णपदक, थाळी फेक प्रकारात रौप्यपदक आणि भालाफेक प्रकारात कांस्य पदक अशी तीन पदके जिंकून स्पर्धा गाजवली.
या शानदार कामगिरीमुळे परवीन खान यांची श्रीलंका येथे होणाऱ्या सातव्या आंतरराष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामध्ये त्यांचे ज्येष्ठ प्रशिक्षक राशीद कुरेशी यांचा मोलाचा वाटा आहे.
परवीन खान यांच्या या घवघवीत यशाबद्दल रफीक शेख, अंजूषा मगर, सोनाली भिसे, पोर्णिमा भोसले, वंदना घडामोडे तसेच राजेश भोसले आदींनी अभिनंदन केले आहे.