
दुखापतीमुळे मोहसीन खान स्पर्धेतून बाहेर
मुंबई ः आयपीएलच्या नव्या हंगामात अष्टपैलू शार्दुल ठाकूरची अचानक एन्ट्री झाली आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने शार्दुलला आपल्या संघात सामील करुन घेतले आहे. दुखापतीमुळे मोहसीन खान हा स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
शार्दुल ठाकूर याने आयपीएल २०२५ मध्ये मागच्या दाराने प्रवेश केला आहे. लखनौ सुपरजायंट्स संघाने स्पर्धा सुरू झाल्यानंतर एका दिवसातच भारतीय वेगवान गोलंदाजाला त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे. मोहसीन खानच्या जागी एलएसजीने शार्दुल ठाकूरचा संघात समावेश केला आहे. दुखापतीमुळे मोहसीन लीगमधून बाहेर आहे.
लखनौ सुपरजायंट्स २४ मार्च रोजी आयपीएल २०२५ मध्ये त्यांच्या मोहिमेला सुरुवात करत आहेत. त्यांचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स संघाशी होणार आहे. यासाठी लखनौ टीम लखनौहून विशाखापट्टणम येथे पोहोचली आहे. शार्दुल ठाकूरही संघासह विझागला पोहोचला आहे. शार्दुल एलएसजीसोबत प्रवास करत असल्याने, तो कधीही संघात येऊ शकतो हे स्पष्ट झाले होते. आता यावर अधिकृत अपडेट देखील आला आहे. मोहसीन खानच्या जागी लखनौ संघात शार्दुल ठाकूरचा समावेश करण्यात आल्याची पुष्टी झाली आहे.
लखनौ सुपरजायंट्सने रविवारी सोशल मीडियावर पोस्ट करून शार्दुल ठाकूरचे स्वागत केले. एलएसजीने त्याच्या एक्स अकाउंटवर लिहिले, ‘हेडलाइन्स काही फरक पडत नाहीत, पण लॉर्ड्स महत्त्वाचे असतात. शार्दुल सध्या घरी आहे. आयपीएलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, शार्दुलची निवड नोंदणीकृत निम्नस्तरीय खेळाडूंच्या गटातून करण्यात आली आहे. त्याला २ कोटी रुपये बेस प्राईस मिळेल. हा त्याचा सहावा आयपीएल संघ असेल. शार्दुल ठाकूर याने यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज), कोलकाता नाईट रायडर्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळलेला आहे.
मोहसीन खानचे स्वप्न भंगले
शार्दुल ठाकूरच्या नशिबाने त्याला अचानक आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला असेल पण मोहसिन खानचे मन दुखावले आहे. गेल्या हंगामात लखनौसाठी मोहसीन खानने शानदार कामगिरी केली होती. तो संघातील आघाडीच्या वेगवान गोलंदाजांमध्ये गणला जात असे पण दुखापतीमुळे त्याचे स्वप्न भंगले आहे.