
एफआयजी वर्ल्ड कपमध्ये पटकावले कांस्यपदक
नवी दिल्ली ः तुर्कीतील अंताल्या येथे झालेल्या एफआयजी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स अॅपरेटस वर्ल्ड कपच्या व्हॉल्ट फायनलमध्ये भारतीय जिम्नॅस्ट प्रणती नायक हिने कांस्यपदक जिंकले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २९ वर्षीय प्रणतीने व्हॉल्ट फायनलमध्ये एकूण १३.४१७ गुण मिळवत अमेरिकन जोडी जयला हँग (१३.६६७) आणि क्लेअर पीस (१३.५६७) यांच्या मागे तिसरे स्थान पटकावले.
प्रणतीने व्हॉल्ट पात्रता फेरीत १३.३१७ गुण मिळवले होते. प्रणती म्हणाली की, ‘वर्षाची सुरुवात पदकाने करणे ही एक उत्तम भावना आहे. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. मी गेल्या वर्षीही जिंकले होते, त्यामुळे मी खरोखर आनंदी आहे. माझे लक्ष आता आशिया चॅम्पियनशिप आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकण्यावर आहे, या वर्षीचे माझे लक्ष्य हेच आहे.’
प्रणतीने गेल्या वर्षी पॅरिस ऑलिंपिकपूर्वी कैरो येथे झालेल्या एफआयजी अॅपरेटस वर्ल्ड कपच्या महिला व्हॉल्ट स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. तिने २०१९ (उलानबाटार) आणि २०२२ (दोहा) मध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये व्हॉल्ट कांस्यपदक जिंकले होते. दीपा कर्माकर (२०१८ मेर्सिन सुवर्ण, २०१८ कॉटबस कांस्य) आणि अरुणा रेड्डी (२०१८ मेलबर्न विश्वचषक) यांच्यानंतर प्रणती ही व्हॉल्टमध्ये आंतरराष्ट्रीय पदक जिंकणारी तिसरी भारतीय जिम्नॅस्ट आहे. तिने २०१४ आणि २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तसेच २०१४ आणि २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही भाग घेतला. याशिवाय, तिने २०१४, २०१७ आणि २०१९ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही देशाचे प्रतिनिधित्व केले.