
लिजंड्स प्रीमियर लीग ः इशांत राय, अलोक खांबेकरची प्रभावी कामगिरी
छत्रपती संभाजीनगर : लिजंड्स प्रीमियर लीग टी २० स्पर्धेत दुसऱया उपांत्य सामन्यात डीएफसी श्रावणी संघाने राऊडी सुपर किंग्ज संघाला रोमहर्षक सामन्यात अवघ्या दोन धावांनी पराभव करुन अंतिम फेरी गाठली. चार विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा इशांत राय हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. कर्णधार अलोक खांबेकर याने फायटर ऑफ द मॅच पुरस्कार संपादन केला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर हा रोमांचक सामना झाला. डीएफसी श्रावणी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत २० षटकात सर्वबाद १९७ धावसंख्या उभारुन प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. पंकज व निकित चौधरी या सलामी जोडीने आक्रमक सुरुवात केली. पंकज तीन चौकारांसह १४ धावा काढून बाद झाला. निकित चौधरी व दादासाहेब या जोडीने आक्रमक खेळत धावगती कायम ठेवली. दादासाहेब याने २९ चेंडुत ३३ धावा फटकावल्या. त्याने एक षटकार व चार चौकार मारले. अशोक शिंदे (०) गोल्डन डकवर बाद झाला.

सलामीवीर निकित चौधरी याने अवघ्या ३८ चेंडूत ५१ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने दोन उत्तुंग षटकार व चार चौकार मारले. नितीन भुईगळ (५), कर्णधार तनवीर राजपूत (२), इशांत राय (४), सिद्ध जैन (०) हे मधल्या फळीतील फलंदाज स्वस्तात बाद झाले.
एका बाजूने विकेट पडत असताना अमन शेख याने अवघ्या १९ चेंडूत ५२ धावांची वादळी खेळी केली. अमन याने सहा टोलेजंग षटकार व दोन चौकार मारुन मैदान गाजवले. निलेश गवई याने चार चेंडूत दोन षटकार ठोकत १३ धावांचे योगदान दिले.
अलोक खांबेकरची प्रभावी गोलंदाजी
राऊडी सुपर किंग्ज संघाकडून कर्णधार अलोक खांबेकर याने प्रभावी मारा केला. अलोक याने ४१ धावांत चार विकेट घेऊन आपला ठसा उमटवला. इनायत अली याने ३७ धावांत दोन गडी बाद केले. विराज चितळे याने ३३ धावांत दोन बळी घेतले. सय्यद जलिस याने ९ धावांत एक गडी बाद केला.
राऊडी सुपर किंग्ज संघासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. अतुल वालेकर (१४), इनायत अली (१) व मनीष करवा (९) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यामुळे ७८ धावसंख्येवर त्यांचे तीन फलंदाज तंबूत परतले.
एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना सलामीवीर इंद्रजित उढाण याने शानदार फलंदाजी करत डाव सावरला. इंद्रजित याने अवघ्या ३२ चेंडूत ७० धावांची तुफानी खेळी करुन संघाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. या दमदार खेळीत त्याने पाच उत्तुंग षटकार व सात चौकार ठोकले.
इंद्रजीत बाद झाल्यानंतर राऊडी सुपर किंग्ज संघावर दबाव वाढला. विराज चितळे याने १८ चेंडूत ३५ धावा फटकावत सामन्यातील रोमांच अखेरपर्यंत कायम ठेवला. विराजने चार उत्तुंग षटकार व दोन चौकार ठोकले. भूषण घोळवे (४), सनी (१), कर्णधार अलोक खांबेकर (२) व आशिष गवळी (नाबाद ४) यांनी आपले योगदान दिले. पंकज याने कर्णधार अलोक खांबेकर याला क्लीन बोल्ड करुन संघाला दोन धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला. १९ षटकात राऊडी सुपर किंग्ज संघाने सर्वबाद १९५ धावा काढल्या.
डीएफसी श्रावणी संघाच्या विजयाचा हिरो ठरला तो वेगवान गोलंदाज इशांत राय. इशांत याने २५ धावांत महत्वाचे चार बळी टिपले. पंकज याने ६ धावांत दोन गडी बाद करुन त्याला सुरेख साथ दिली. तनवीर राजपूत (१-३१), अमान शेख (१-३९), निलेश गवई (१-५३), दादासाहेब (१-१९) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.