
माउंट माँगानुई : न्यूझीलंड संघाने चौथ्या टी २० सामन्यात पाकिस्तान संघाचा मोठा पराभव करुन मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
चौथ्या टी २० सामन्यात न्यूझीलंड संघाने पाकिस्तानचा ११५ धावांनी पराभव केला. टिम सेफर्ट (४४) आणि फिन अॅलन (५०) यांच्या शानदार सुरुवातीनंतर कर्णधार मायकेल ब्रेसवेलने ४६ धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पाकिस्तानसमोर विजयासाठी २२१ धावांचे लक्ष्य होते. पण संपूर्ण संघ १०५ धावांवर ऑलआउट झाला. न्यूझीलंडने ११५ धावांनी मोठा विजय मिळवला आणि ५ सामन्यांच्या टी २० मालिकेत ३-१ अशी निर्विवाद आघाडी घेतली.
पाकिस्तानचा कर्णधार आगा सलमानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टिम सेफर्ट आणि फिन ऍलन यांनी न्यूझीलंडला धमाकेदार सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ४ षटकांत ५९ धावा जोडल्या. सेफर्टने २२ चेंडूंत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या. फिन ऍलनने २० चेंडूत ५० धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये त्याने ३ षटकार आणि ६ चौकार मारले.
मार्क चॅपमनने १६ चेंडूत २० धावा आणि डॅरिल मिशेलने २३ चेंडूत २९ धावा करून मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावली. शेवटी, कर्णधार मायकेल ब्रेसवेलने २६ चेंडूत ४६ धावांची जलद खेळी केली. या खेळीत त्याने २ षटकार आणि ५ चौकार मारले. न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी २२१ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते.
पाकिस्तानची फलंदाजी कोसळली
पॉवर प्ले मध्ये पाकिस्तान संघाचा अर्धा संघ पॅव्हेलियन मध्ये परतला होता. सलामीवीर मोहम्मद हरिस (२) आणि हसन जवाज (१) अपयशी ठरले. कर्णधार सलमान अली आगा देखील १ धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शादाब खान (१) आणि खुशदिल शाह (६) यांनीही निराशा केली. संघाकडून अब्दुल समदने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ३० चेंडूत ४४ धावा केल्या.
डफीने पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांचे बळी घेत न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली. त्याने चार विकेट्स घेतल्या. त्यात सलामीवीर हसन नवाज (१), कर्णधार आगा सलमान (१), इरफान खान नियाझी (२४) आणि हरिस रौफ (६) यांचे बळी होते. त्याने ४ षटकांत फक्त २० धावा दिल्या.
झाचेरी फौल्क्सने त्याच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये ३ विकेट्स घेतल्या आणि २५ धावा दिल्या. त्याच्याशिवाय जेम्स नीशम, ईश सोधी आणि विल ओ’रोर्क यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.