नाशिकच्या दिलीप गावितने पटकावले सुवर्णपदक 

  • By admin
  • March 23, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

साईवर्धन, साहिल, चैतन्यला रौप्यपदक

नवी दिल्ली : खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये अ‍ॅथलेटिक्स प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. नाशिकच्या दिलीप गावित याने पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत टी ४७ या प्रकारात सुवर्णपदक पटकावले. कोल्हापूरचा साईवर्धन पाटील, कराडचा साहिल सय्यद, चैतन्य पाठक हे रौप्य पदकाचे मानकरी ठरले.

जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्सचा थरार सुरू आहे. नाशिक जिल्ह्याचा खेळाडू दिलीप गावितने ४८.७६ सेकंद वेळेत शर्यत जिंकली. हरियाणाच्या जसबीर याने (४९.८८ सेकंद) रौप्य तर गुजरातच्या भाविक कुमारने (५१.०८) कांस्यपदक प्राप्त केले.

पुरुषांच्या एफ ३७ लांब उडी प्रकारात कोल्हापूरच्या साईवर्धन पाटील याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अवघ्या ३४ सेंटीमीटरने त्याचे सुवर्णपदक हुकले. साईवर्धनने ११.५९ मीटर लांब उडी मारली. साईवर्धन हा पॅरालिम्पिकमधील पदकविजेता सचिन खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. खेलो इंडिया स्पर्धेतील त्याचे हे पहिले पदक ठरले.

कराडच्या साहिल सय्यद याने पुरुषांच्या गोळाफेकमध्ये ७.८२ मीटरचा टप्पा गाठत रौप्यपदकाचा मान पटकावला. यात तमिळनाडूच्या इम्रान रसूलने (२९.२०) सुवर्ण जिंकले. पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत टी १३ प्रकारात चैतन्य पाठक याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने ५४.९९ सेकंदात हे अंतर पार केले. ५४.४१ सेकंद वेळ देणारा हरियाणाचा सुबोध भट सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत टी ५३, ५४ प्रकारात गीता चौहान हिने कांस्यपदक प्राप्त केले. तिने २८.५१ सेकंदात शर्यत पूर्ण केली.

प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्यामुळे घडला दिलीप
नाशिक जिल्ह्यातील तोरण डोंगरी या आदिवासी पाड्यातील रहिवासी असलेल्या दिलीपचा वयाच्या दहाव्या वर्षी अपघात झाला. घरासाठी सरपण गोळा करण्याकरिता फांद्या तोडण्यासाठी तो झाडावर चढला होता. त्यावेळी टोल जाऊन झाडावरून पडल्याने त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्याचा हात कोपरापासून कापावा लागला.

आज मी जे काही आहे, ते केवळ अन् केवळ वैजनाथ काळे सरांमुळे. मी १२ वर्षांचा असताना त्यांनी मला दत्तक घेतले आणि आपल्या घरी नेले. त्यांच्यामुळेच मी खेळाकडे वळलो आणि मला धावण्याची गोडी लागली, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या दिलीप गावित याने दिली. येत्या काळात असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियन गेम्समध्ये पदक जिंकण्याचे ध्येय ठेवल्याचे त्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *