
राजश्री राठोड, शुक्ला बीडकर, सोनम पाटीलला रौप्यपदक
नवी दिल्ली : खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सलग तिसरा दिवस महाराष्ट्रासाठी सुवर्णमय ठरला. आर्चरीत आदिल अन्सारी, नेमबाजीत सागर कातळेने अव्वल यश संपादून गोल्डन संडे साजरा केला. आर्चरी स्पर्धेत राजश्री राठोड हिने, पॉवरलिफ्टिंग प्रकारात शुक्ला बीडकर, सोनम पाटील हिने रौप्य पदके जिंकून दिवस गाजवला.

जवाहरलाल नेहरू स्टेडियम परिसरात सुरू असलेल्या आर्चरीत स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या आदिल अन्सारीने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पुरूषाच्या डब्ल्यू १ प्रकारात सलग दुसर्या स्पर्धेत आदिलने सोनेरी यशाचा वेध घेतला. अंतिम फेरीत हरियाणाच्या नवीन दलालविरूध्द आदिलची सुरूवात खराब झाली होती. पहिल्या दोन फेर्यात पिछाडीवर असताना अंतिम फेरीत अचुक नेमबाजी करत आदिल याने सुवर्ण पदक खेचून आणले. १२३ गुणांसह अवघा दोन गुणांनी आदिलने अव्वल यश संपादले. हरियाणाच्या दलाल यांना १२१ गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात यवतमाळच्या राजश्री राठोडला सुवर्ण यशाने हुलकावणी दिली. प्रथमच खेलो इंडिया स्पर्धेची अंतिम फेरीत धडक मारणार्या राजश्रीला आंतरराष्ट्रीय खेळाडू पूजाने ६-४ फरकाने नमवले. ३ वर्षांची असताना राजश्रीचा उजवा पाय गुडघ्यापासून अंधू झाला होता. ११ वी शिकत असलेल्या राजश्री ही शेतमजूरांची मुलगी असून प्रशिक्षक सुरेंद्र राठोड यांचे मार्गदर्शन दिला मिळत आहे.

डॉ कर्णीसिंग शूटिंग रेंजवर सलग दुसर्या दिवशी जय महाराष्ट्राचा जल्लोष दुमदुमला. लातूरच्या सागर कातळेने मिश्र १० मीटर एअर रायफल प्रोन एसएच १ प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतला. २५१.३ गुणांची कमाई करीत प्रथमच खेलो इंडिया स्पर्धेच्या सुवर्ण यशावर सागरने नाव कोरले. लातूरमधील शेतकर्याचा मुलगा असणार्या सागर जन्मापासून दोन्ही पायांची अधू आहे. २०२२ पासून त्याने नेमबाजी खेळायला सुरूवात केली. पुण्यातील बालेवाडीमधील शूटिंग रेंजवर तो सराव करीत असतो. दिल्लीतील स्पर्धेत प्रवासामुळे पाठ दुखत असतानाही सागरने एकाग्रतेने नेमबाजीत करीत अव्वल यश संपादन केले आहे.
पॉवरलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४१ किलो गटात महाराष्ट्राच्या शुक्ला बीडकर, सोनम पाटीलने रूपेरी यशाचे वजन पेलले. कोल्हापूरच्या ३५ वर्षीय शुक्ला बीडकरने ५० किलो वजन उचलून सलग दुसर्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. गुजरातची नयना राबरीे ५१ किलो वजन उचलून सुवर्ण पदकाची मानकरी ठरली.
महिलांच्या ४५ किलो गटात कोल्हापूरच्या सोनम पाटीलने ५९ किलो वजन उचलण्याची कामगिरी करीत रौप्यपदकाची कमाई केली. शुक्ला बीडकर व सोनम पाटील कोल्हापूरात बिभीषण पाटील यांच्या व्यायामशाळेत सारिका सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करतात.