
हैदराबाद : इशान किशनच्या स्फोटक नाबाद शतकाच्या (१०६) बळावर सनरायझर्स संघाने राजस्थान रॉयल्स संघावर ४४ धावांनी विजय नोंदवत आयपीएल स्पर्धेच्या नव्या हंगामाची सुरुवात शानदार केली.
राजस्थान रॉयल्स संघासमोर विजयासाठी २८७ धावांचे मोठे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघ २० षटकात सहा बाद २४२ धावा काढल्या. ध्रुव जुरेल याने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. जुरेल याने अवघ्या ३५ चेंडूत ७० धावांची वादळी खेळी केली. त्याने सहा षटकार व पाच चौकार मारले. संजू सॅमसन याने ३७ चेंडूत ६६ धावा फटकावत संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली.
यशस्वी जयस्वाल (१), कर्णधार रियान पराग (४), नितीश राणा (११) हे आक्रमक फलंदाज स्वस्तात बाद झाल्याचा फटका आरआर संघाला बसला. शिमरॉन हेटमायर याने २३ चेंडूत ४२ धावा फटकावत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने चार षटकार व एक चौकार मारला. शुभम दुबे याने ११ चेंडूत नाबाद ३४ धावा काढल्या. मात्र, त्याचे प्रयत्न अपुरे पडले. त्याने चार षटकार व एक चौकार मारला. आर्चर (१) नाबाद राहिला.
हैदराबाद संघाने हर्षल पटेल याने ३४ धावांत दोन गडी बाद केले. सिमरजीत सिंग याने ४६ धावांत दोन बळी टिपले. मोहम्मद शमी (१-३३), झांपा (१-४८) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
धमाकेदार फलंदाजी
इशान किशनचे झंझावाती शतक (१०६) आणि ट्रॅव्हिस हेड याच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात २८६ अशी भक्कम धावसंख्या उभारली. या हंगामातही सनरायझर्स हैदराबादचा दृष्टिकोन गेल्या वर्षीसारखाच होता. राजस्थान रॉयल्स संघाविरुद्धच्या सामन्यात पहिल्या षटकापासून हैदराबादच्या फलंदाजांनी त्यांचे इरादे स्पष्ट केले. या हंगामात शतक करणारा इशान किशन हा पहिला फलंदाज आहे. तर ट्रॅव्हिस हेडने ३१ चेंडूत ६७ धावा केल्या.
इशान किशनने ४५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तो ४७ चेंडूत १०६ धावा करून नाबाद परतला. त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाकडून पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले. इशानच्या बॅटने ११ चौकार आणि ६ षटकार मारले. सनरायझर्स हैदराबादने पॉवरप्लेमध्ये म्हणजेच पहिल्या ६ षटकांत ९४ धावा केल्या. तथापि, हैदराबाद संघ आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या फक्त दोन धावांनी हुकला. हा विक्रमही हैदराबादच्या नावावर आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या सर्व फलंदाजांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला. अभिषेक शर्माने ११ चेंडूत ५ चौकारांसह २४ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने ३१ चेंडूत ६७ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून ९ चौकार आणि ३ षटकार लागले. नितीश कुमार रेड्डी यांनी १५ चेंडूत ३० धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारला. हेनरिक क्लासेनने १४ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. क्लासेनने ५ चौकार आणि १ षटकार मारला. सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या डावात एकूण १२ षटकार मारले. एसआरएच संघाने एकूण ३४ चौकार मारले.
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना चांगलाच फटका बसला. जोफ्रा आर्चरचा आयपीएलमध्ये एक लाजिरवाणा विक्रम आहे. आर्चरने चार षटकांत ७६ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. आता तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज बनला आहे. संदीप शर्माने त्याच्या चार षटकांत ५१ धावा दिल्या तर फिरकी गोलंदाज महेश दीक्षानाने त्याच्या चार षटकांत ५२ धावा दिल्या. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने चार षटकांत ४४ धावा देत तीन विकेट्स घेतल्या.