
२०१३ पासून पहिल्या सामन्यात पराभव; चेन्नई सुपर किंग्जचा चार विकेटने विजय
चेन्नई : आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पराभूत होण्याची मुंबई इंडियन्स संघाची परंपरा नव्या हंगामात देखील कायम राहिली. कर्णधार बदलले तरी पराभवाची मालिका खंडित करण्यात आतापर्यंत मुंबईला यश आलेले नाही. चेन्नई सुपर किंग्ज संघाने चार विकेट राखून सामना जिंकून विजयी सलामी दिली. २०१३ पासून मुंबई संघ पहिल्या सामन्यात पराभूत होत आहे. आतापर्यंत १२ लढती त्यांनी गमावल्या आहेत. हा मुंबईचा १३वा पराभव ठरला आहे.
मुंबई इंडियन्स संघाला १५५ धावांवर रोखल्यानंतर चेन्नई संघाला विजयासाठी १५६ धावांची आवश्यकता होती. राहुल त्रिपाठी (२) लवकर बाद झाला. मात्र, त्यानंतर रचिन रवींद्र व कर्णधार रुतुराज गायकवाड या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी करत संघाला विजयपथावर आणले. रुतुराजने अवघ्या २६ चेंडूत ५३ धावांची बहारदार खेळी केली. अर्धशतकात त्याने तीन उत्तुंग षटकार व सहा चौकार मारले. विघ्नेश पुथूर याने पहिल्याच षटकात रुतुराजला बाद करुन सामन्यात रंगत आणली. त्यानंतर विघ्नेश याने शिवम दुबे (९)व दीपक हुडा (३) यांचीही विकेट घेतली.
९५ धावांवर तीन विकेट गेल्यानंतर रचिन रवींद्र याने परिस्थितीनुसार संयमी फलंदाजी करत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर बनवला. रचिन रवींद्र याने उत्तुंग षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. त्याने ४५ चेंडूत नाबाद ६५ धावांचे बहुमोल योगदान दिले. त्याने चार टोलेजंग षटकार व दोन चौकार मारले. रवींद्र जडेजा याने १६ धावांची उपयुक्त खेळी केली. महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला खरा पण त्याला धाव काढण्याची संधी मिळाली नाही. चेन्नई सुपर किंग्ज संघाने १९.१ षटकात सहा बाद १५८ धावा फटकावत शानदार विजयी सलामी दिली. मुंबई संघाकडून विघ्नेश पुथूर याने ३२ धावांत तीन गडी बाद करुन ठसा उमटवला. विल जॅक्स (१-३२) व दीपक चहर (१-१८) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
नूरने बदलला मुंबईच्या फलंदाजीचा नूर
नूर अहमद आणि खलील अहमद यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्स संघाला १५५ धावांवर रोखले. आयपीएल २०२५ चा तिसरा सामना चेपॉक येथे खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर मुंबईने नऊ विकेट्स गमावून सीएसकेसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
या सामन्यात मुंबईची परिस्थिती सुरुवातीपासूनच वाईट राहिली. कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात खाते न उघडता पॅव्हेलियन मध्ये परतला. त्याला खलील अहमदने आपली बळी बनवले. त्यानंतर खलीलने रायन रिकेलटन (१३) ला बाद केले. सीएसकेमध्ये परतल्यानंतर पहिला सामना खेळणारा अश्विन देखील मागे नव्हता. तो येताच त्याने विल जॅक्सला शिवम दुबेकडून झेलबाद केले आणि त्याला पहिले यश मिळाले. रोहित बाद झाल्याचा मुंबईला जबर धक्का बसला आणि त्यानंतर मुंबई संघाची फलंदाजी बहरू शकली नाही.
३६ धावांत तीन विकेट गमावलेल्या मुंबईला चांगल्या भागीदारीची आवश्यकता होती. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा क्रीजवर उपस्थित होते. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये ४० पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली. तथापि, ही भागीदारी मोठी पातळी गाठण्यापूर्वीच महेंद्रसिंग धोनीने चपळता दाखवली आणि सूर्याला यष्टीचीत केले. २६ चेंडूत २९ धावा करून स्टँड-इन कर्णधार बाद झाला.
मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक ३१ धावा केल्या. त्याच्याशिवाय रॉबिन मिंजने तीन, नमन धीरने १७, मिचेल सँटनरने ११ आणि ट्रेंट बोल्टने एक धाव केली. या सामन्यात दीपक चहर २८ धावांवर नाबाद राहिला आणि सत्यनारायण राजू १ धावांवर नाबाद राहिला. चहरच्या फटकेबाजीमुळे मुंबईला दीडशे धावांचा टप्पा गाठण्यात यश आले.
सीएसकेकडून नूर अहमदने चार (४-१८) आणि खलील अहमदने तीन विकेट्स (३-२९) घेतल्या. त्याच्याशिवाय, नाथन एलिस आणि रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी एक यश मिळाले. नूर अहमदची गोलंदाजी चर्चेचा विषय बनली. नूरने सूर्यकुमार, तिलक वर्मा, रॉबिन मिंझ, नमन धीर अशा विकेट घेत मुंबईच्या फलंदाजीचा नूरच बदलून टाकला.