
डीबीए संघावर २० धावांनी विजय; मधुर पटेल, मंगेश निटूरकर यांची चमकदार कामगिरी निर्णायक
छत्रपती संभाजीनगर : लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत मास्सिया अ संघाने रोमांचक अंतिम सामन्यात डीबीए संघाचा २० धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. कर्णधार मधुर पटेल व अष्टपैलू मंगेश निटूरकर यांची कामगिरी निर्णायक ठरली. मुकुल जाजूची ७५ धावांची शानदार खेळी व्यर्थ ठरली.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर प्रकाशझोतात हा अंतिम सामना खेळवण्यात आला. मास्सिया अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार मधुर पटेल याने ९५ धावांची धमाकेदार खेळी करत संघाला २० षटकात चार बाद २०२ अशी भक्कम धावसंख्या उभारुन दिली.

प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्णधार मधुर पटेल व मुकीम शेख या सलामी जोडीने संघाला तुफानी सुरुवात करुन देताना १२.१ षटकात १३२ धावांची शानदार भागीदारी केली. मुकीम शेख २९ धावांवर बाद झाला. त्याने तीन चौकारांसह २९ धावा काढल्या. रोहन शाह याने १५ चेंडूत १७ धावा फटकावल्या. त्याने दोन चौकार मारले. शुभम मोहिते याने ९ चेंडूत १६ धावा काढल्या. त्याने एक षटकार व दोन चौकार मारले. रुद्राक्ष बोडके याने नाबाद २८ धावांची वेगवान खेळी केली. त्याने दोन षटकार ठोकले.

मधुर पटेलची वादळी फलंदाजी
या सामन्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरली तरी कर्णधार मधुर पटेलची तुफानी फलंदाजी. या स्पर्धेत मधुर पटेल याने अनेक संस्मरणीय खेळी केल्या आहेत.परंतु, अंतिम सामन्यातील मधुर पटेलची वादळी फलंदाजी कमालीची प्रेक्षणीय ठरली. मधुर पटेल याने अवघ्या ४५ चेंडूंचा सामना करताना ९५ धावा ठोकल्या. या बहारदार खेळीत मधुर याने तब्बल ८ षटकार ठोकले व सहा चौकार मारले. त्याने २११.११च्या सरासरीने फलंदाजी केली हे विशेष.

डीबीए संघाकडून सुनील भोसले हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने २३ धावांत दोन गडी बाद केले. अजय शितोळे (१-३६) व दिनकर काळे (१-४१) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
डीबीए संघासमोर विजेतेपदासाठी २०३ धावांचे लक्ष्य होते. मुकुल जाजू व अजय शितोळे या सलामी जोडीने आक्रमक सुरुवात करताना पाच षटकातच अर्धशतकी भागीदारी करुन सामन्यातील रोमांच वाढवला. नवव्या षटकात धर्मेंद्र वासानी ही घातक भागीदारी फोडली. अजय शितोळेची २५ (२ षटकार, १ चौकार) धावांची वेगवान खेळी त्याने संपुष्टात आणून संघाला पहिले यश मिळवून दिले. अजय व मुकुल या जोडीने ८२ धावांची भागीदारी करुन गोलंदाजांवर दबाव वाढवला.
१० षटकाअखेर डीबीए संघाने एक बाद ९३ धावा काढल्या. धावांचे शतक पार केल्यानंतर सुरज मुरमुडे (५) व त्यानंतर मुकुल जाजू (७५) हे बाद झाल्यानंतर डीबीए संघाचा डाव गडगडला. मुकुल जाजू याने अवघ्या ३९ चेंडूत ७५ धावांची धमाकेदार अर्धशतकी खेळी साकारली. त्याने तीन उत्तुंग षटकार व नऊ चौकार मारले.

मुकुल बाद झाल्यानंतर गौरव शिंदे (९), कर्णधार मोहित घाणेकर (१०) हे स्वस्तात बाद झाले. संघ अडचणीत असताना अष्टपैलू हरमीतसिंग रागी १५ चेंडूत २५ धावा काढून धावबाद झाला. त्याने एक षटकार व दोन चौकार मारले. धनंजय कांबळे (३) याला मंगेश निटूरकर याने बाद करुन संघाचा विजय निश्चित केला. सत्यजित वकील याने दोन चौकारांसह नाबाद १६ धावांचे योगदान दिले. डीबीए संघाला २० षटकात सात बाद १८२ धावांवर रोखून मास्सिया अ संघाने २० धावांनी सामना जिंकत विजेतेपद पटकावले.
मास्सिया अ संघाकडून मंगेश निटूरकर याने प्रभावी मारा करत ३५ धावांत तीन विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शुभम मोहिते (१-३९), धर्मेंद्र वासानी (१-२९), रोहन शाह (१-३६) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
मालिकावीर ः मधुर पटेल
सामनावीर ः मधुर पटेल
फलंदाज ः सचिन शेडगे
गोलंदाज ः दिनकर काळे
पारितोषिक वितरण सोहळा
विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी लाईफलाईन मेडिकल डिव्हाईस कंपनीचे संचालक डॉ विक्रांत भाले, मास्सियाचे अध्यक्ष चेतन राऊत, उपाध्यक्ष मनीष अग्रवाल, अर्जुन गायकवाड, नरेंद्र कुलकर्णी, संदीप तुळापुरकर, स्पोर्ट्स सेक्रेटरी अजिंक्य पाथ्रीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास मंगेश निटूरकर, मयूर चौधरी, सूरज चामले, गिरीश खत्री, राजेश चौधरी, विजय लेकुरवाळे, सुरेश गायकवाड, राजेश मानधणी, सचिन गायके, मिलिंद कुलकर्णी, राजेश विधाते, दुष्यंत आठवले, नितीन तोष्णीवाल, श्रीकांत सूर्यवंशी, प्रल्हाद गायकवाड, सुरेश खिल्लारे, जगदीश जोशी आदी उपस्थित होते.