
चेन्नई ः संघाची गरज आहे म्हणून मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरलो असे कर्णधार रुतुराज गायकवाड याने विजयानंतर सांगितले.
महाराष्ट्राचा धमाकेदार फलंदाज रुतुराज गायकवाड हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करत आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने बलाढ्य मुंबई इंडियन्स संघाला पराभूत केले. या विजयात रुतुराज गायकवाड याचे दमदार अर्धशतक महत्त्वाचे ठरले.
रुतुराज गायकवाड हा खरा तर धमाकेदार सलामीवीर फलंदाज आहे. परंतु, आयपीएलच्या नव्या हंगामात पहिल्या सामन्यात रुतुराज गायकवाड हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. या नव्या भूमिकेत रुतुराज गायकवाड याने लगेच जम बसवला. त्याने ५३ धावांची जलद अर्धशतकी खेळी केली.
विजयानंतर रुतुराज गायकवाड म्हणाला की, मी बाद झाल्यानंतर सामना तणावपूर्ण झाला असता. कधीकधी सामने जवळचे असतात, पण मी विजयाने आनंदी असतो. मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे ही संघाची गरज आहे. यामुळे नवीन संघाला संतुलन मिळते कारण राहुल त्रिपाठी वरच्या स्थानावर आक्रमकपणे खेळू शकतो.
फिरकीपटूंच्या कामगिरीबद्दल रुतुराज म्हणाला, आमच्या फिरकीपटूंनी सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी केली. खलील अहमद गेल्या दोन-तीन वर्षांपासून चांगली कामगिरी करत आहे, तो अनुभवी आहे. नूर हा ‘एक्स फॅक्टर’ आहे, तो संघात असणे आमच्यासाठी चांगले आहे. धोनी आमच्यासाठी नेहमीसारखाच आहे, तो या वर्षी अधिक तंदुरुस्त आहे आणि नेटमध्ये खूप षटकार मारत आहे.