
चेन्नई ः चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा युवा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूर याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आयपीएल स्पर्धेत पदार्पण करताना केरळच्या विघ्नेश याने तीन विकेट घेऊन क्रिकेट विश्वाला चकीत केले. याचे मुख्य कारण म्हणजे या सामन्यापूर्वी विघ्नेश याने कोणताही मोठा सामना खेळलेला नाही.
चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात स्टार फलंदाज रोहित शर्माच्या जागी फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूर याला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळवण्याचा धाडसी निर्णय मुंबईने घेतला आणि विघ्नेश याने अप्रतिम कामगिरी नोंदवत पहिल्याच आयपीएल सामन्यात तीन विकेट घेऊन झोकात पदार्पण केले. विघ्नेश याने वरिष्ठ पातळीवर कोणतेही घरगुती सामने न खेळता थेट आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे हे विशेष.
आठव्या षटकात मुंबई इंडियन्सचा कार्यवाहक कर्णधार सूर्यकुमार यादव याने विघ्नेश पुथूरला गोलंदाजी करण्यासाठी बोलावले. तेव्हा मुंबई आपल्या १५५ धावांचे रक्षण करत होती. डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज याने त्याच्या पहिल्याच षटकात सीएसकेचा कर्णधार रुतुराज गायकवाडला ५३ धावांवर बाद केले. गायकवाडने पुथूरचा चेंडू उंच फटकावला आणि सीमारेषेवर झेलबाद झाला. त्याच्या दुसऱ्याच षटकात त्याने शिवम दुबेला गुगलीने फसवले आणि तिलक वर्माने त्याला झेलबाद केले. त्यानंतर त्याने दीपक हुड्डाची विकेट घेतली, हुड्डाने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि लॉन्ग-ऑनवर तो झेलबाद झाला. हुडाच्या रूपात पुथूरने आपला तिसरा बळी घेतला.
विघ्नेश पुथूरचे वडील ऑटो चालक
विघ्नेश पुथूरचे वडील ऑटो चालक आहेत. हा तरुण फिरकीपटू केरळकडून अंडर १४ आणि अंडर १९ पातळीवर खेळला आहे. स्काउट्स दरम्यान मुंबई इंडियन्सने त्याला पहिल्यांदा पाहिले. गेल्या वर्षी केरळ क्रिकेट लीगमध्ये अॅलेप्पी रिपल्सकडून खेळताना त्याने तीन सामन्यात दोन विकेट्स घेतल्या होत्या. पुथूरने तामिळनाडू प्रीमियर लीगमध्येही भाग घेतला. पेरिंथलमन्ना येथील जॉली रोव्हर्स क्रिकेट क्लबसाठी प्रभावी कामगिरी केल्यानंतर त्याने केसीएल टी २० स्पर्धेत स्थान मिळवले. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या आयपीएल मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला करारबद्ध केले. विघ्नेश पुथूरने त्याच्या ४ षटकांमध्ये ३२ धावा देत ३ बळी घेतले.
धोनीने केले विघ्नेश पुथूरचे कौतुक
लक्ष्याचा पाठलाग करताना, जेव्हा धोनी चेन्नई सुपर किंग्जकडून फलंदाजीसाठी आला तेव्हा संघ जवळजवळ सामना जिंकला होता. सामना संपल्यानंतर, विघ्नेश पुथूर आणि धोनी बोलत असल्याचे दिसून आले. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की पुथुर धोनीला एखाद्या चाहत्याप्रमाणे काहीतरी बोलत आहे आणि धोनी देखील त्याचे लक्षपूर्वक ऐकत आहे आणि उत्तर देत आहे. यानंतर धोनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याचे कौतुक करताना दिसला. सोशल मीडियावर चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. विघ्नेश पुथूरचे त्याच्या दमदार कामगिरीसाठी खूप कौतुक होत आहे.