
सातारा (नीलम पवार) ः श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलामध्ये जागतिक महिला दिनी महिलांसाठी कुस्ती प्रशिक्षण केंद्राची सुरवात करण्यात आली आहे.
भारताला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे स्व पै खाशाबा जाधव हे सातारा जिल्ह्यातील मौजे गोळेश्वर ता कराड येथील असून, यामुळे सातारा जिल्ह्याचा बहुमान संपूर्ण जगामध्ये वाढला आहे. तसेच आजही अनेक मल्ल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्चत्तम कामगिरी करुन सातारा जिल्ह्याचा गौरव वाढवित आहेत. यामध्ये महिला मल्ल देखील उत्साहाने सहभागी होऊन भर घालीत आहेत.
परंतु, महिलांकरिता जिल्ह्यामध्ये तंत्रशुद्ध प्रशिक्षण केंद्र नसल्याने कुस्ती खेळामध्ये महिला खेळाडूंची कामगिरी उंचाविणे अडचणीचे होते. त्यामुळे महिलांकरिता तंत्रशुद्ध प्रशिक्षण केंद्र उभारणे आवश्यक असल्याने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत महिला दिनाचे औचित्य साधून श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे महिलांकरिता कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन शिवानीताई कळसकर यांच्या हस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रसंगी शिवानीताई कळसकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन सदर प्रशिक्षण केंद्रामुळे महिला मल्लांच्या कामगिरीमध्ये सुधारणा होऊन, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक वाढविण्यास मदतच होईल; तसेच या केंद्रातून महिला ऑलिम्पिक पदक मिळवतील असे सांगितले.
या उद्घाटन प्रसंगी मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी संस्कृती मोरे, कला व क्रीडा मंचचे राज्य अध्यक्ष सुनील जाधव तसेच महान भारत केसरी पदक विजेती व शिवछत्रपती पुरस्कार्थी, प्रशिक्षक कोमल गोळे, सहाय्यक क्रीडा विकास अधिकारी हे उपस्थित होते. हे प्रशिक्षण केंद्र सकाळ व सायंकाळ सत्रात सुरु असल्याने, जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या प्रशिक्षण केंद्रामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले आहे.