
ईश्वरी अवसरेचे शतक, गायत्री सुरवसेचे पाच बळी
गुवाहाटी ः बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या २३ वर्षांखालील महिला एकदिवसीय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत मुंबई महिला संघाने रोमहर्षक उपांत्य सामन्यात महाराष्ट्र महिला संघावर अवघ्या तीन धावांनी विजय नोंदवत अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या ईश्वरी अवसरे हिने शानदार शतकी खेळी करत सामना गाजवला असला तरी तिचे प्रयत्न अपुरे पडले.
फुलंग येथील एसीए क्रिकेट अकादमी मैदानावर हा सामना झाला. मुंबई महिला संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात सात बाद २८२ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना महाराष्ट्र महिला संघाने ५० षटकात सर्वबाद २७९ धावा काढल्या. शेवटच्या चेंडपर्यंत रोमांचक झालेल्या या लढतीत महाराष्ट्र संघाला अवघ्या तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
मुंबई संघाच्या इरा जाधव (८४) व रिया चौधरी (४७) या सलामी जोडीने ९४ धावांची भागीदारी करुन संघाला शानदार सुरुवात करुन दिली. रिया चौधरी सहा चौकारांसह ४७ धावा काढून बाद झाली. इरा जाधव हिने १०६ चेंडूंचा सामना करत १० चौकारांसह ८४ धावांची दमदार खेळी करत डावाला आकार दिला. सानिका चालके हिने ५६ चेंडूत ५९ धावांची वेगवान अर्धशतकी खेळी साकारली. सानिकाने सहा चौकार व एक षटकार मारला.
आघाडीच्या फलंदाजांनी बहारदार फलंदाजी केल्यानंतर मानसी हिने ३१ चेंडूत नाबाद ३८ धावा फटकावल्या. तिने पाच चौकार मारले. सिमरन शेख हिने १९ चेंडूत २८ धावा काढल्या. तिने दोन षटकार व तीन चौकार मारले. खुशी (०), महेक पोकर (४), झील डिमेलो (५) यांनी निराशा केली.

महाराष्ट्र महिला संघाकडून गायत्री सुरवसे हिने ३९ धावांत पाच विकेट घेऊन आपला ठसा उमटवला. खुशी मुल्ला हिने एक विकेट घेताना तब्बल ७० धावा मोजल्या. इशिता खळे हिने ५४ धावांत एक बळी घेतला.
महाराष्ट्र महिला संघाला विजयासाठी २८३ धावांची आवश्यकता होती. खुशी मुल्ला (९), ईश्वरी सावकार (१५) या स्वस्तात बाद झाल्या. सलामीवीर ईश्वरी अवसरे हिने शानदार फलंदाजी केली. तिने ९५ चेंडूंचा सामना करत ११९ धावांची बहारदार शतकी खेळी करुन सामन्यातील रोमांच कायम ठेवला. तिने पाच षटकार व १३ चौकार मारले.
भाविका अहिरे हिने ६४ चेंडूत ५३ धावांची जलद अर्धशतकी खेळी साकारली. भाविकाने एक षटकार व सहा चौकार मारले. आयशा शेख हिने १७ चेंडूत २० धावा फटकावल्या. तिने दोन षटकार व एक चौकार मारला. श्रद्धा गिरमे हिने २८ चेंडूत १९ धावांचे योगदान दिले. तिने तीन चौकार मारले. उत्कर्षा कदम शून्यावर बाद झाली. कर्णधार इशा पाठारे हिने ३४ चेंडूत नाबाद ३३ धावा काढून सामन्यात शेवटपर्यंत रोमांच ठेवला. तिने पाच चौकार मारले. श्रुती (२), गायत्री सुरवसे (३), इशिता खळे (२) या लवकर बाद झाल्याने महाराष्ट्राला निसटता पराभव स्वीकारावा लागला.
मुंबई महिला संघाकडून मानसी हिने ५१ धावांत चार विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. निर्मिती राणे (२-४६), सानिका चालके (२-५६) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. झील डिमेलो (१-३४), ययाती (१-४०) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.