
ढाका ः बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बाल याला हृदयविकाराचा झटका आला आहे. सामना खेळत असताना तमीम इक्बाल याला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमीम इक्बाल ढाका प्रीमियर लीग (डीपीएल) मध्ये मोहम्मद स्पोर्टिंग क्लब संघाकडून खेळत होता. तमिम इक्बालने क्षेत्ररक्षण करताना छातीत दुखत असल्याची तक्रार केली. सोमवारी ढाका प्रीमियर लीगमध्ये मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब हे संघ आमने सामने होते. या दरम्यान तमीम इक्बाल याला हृदयविकाराचा झटका आला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमीम इक्बाल याला फिल्डिंग करताना अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर त्याला फजिलातुनेशा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, तमीम इक्बालचा वैद्यकीय अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) डॉक्टर देबाशिष चौधरी यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. खरंतर, तमीम इक्बाल याने छातीत दुखण्याची तक्रार करताच, त्याला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली. क्रिकेट वेबसाइट क्रिकइन्फोनुसार, तमिमने ५० षटकांच्या सामन्याच्या पहिल्या डावात याची तक्रार केली होती, त्यानंतर वैद्यकीय तज्ञ ताबडतोब पोहोचले.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
७० कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, तमीम इक्बालने २४३ एकदिवसीय आणि ७८ टी २० सामन्यांमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले. कसोटी स्वरूपात, तमिम इक्बालने ३८.८९ च्या सरासरीने ५१३४ धावा केल्या. याशिवाय, त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ३६.६५ च्या सरासरीने ८३५७ धावा केल्या. त्याने बांगलादेशसाठी टी २० स्वरूपात ११७.२० च्या स्ट्राईक रेटने आणि २४.०८ च्या सरासरीने १७५८ धावा केल्या. तमीम इक्बालने एकदिवसीय सामन्यांमध्ये १० शतके केली. याशिवाय, तमीम इक्बालच्या नावावर कसोटी स्वरूपात १४ शतके आहेत. तर या फलंदाजाने टी २० स्वरूपात एकदा शतकाचा टप्पा ओलांडला.