
अकुताई,भाग्यश्री, प्रतिमा सलग दुसर्यांदा पदकवीर
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या महिलाशक्ती जयजयकार सलग दुसर्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्येही दुमदुमला. अॅथलेटिक्समध्ये अकुताई उनभगत, भाग्यश्री जाधव पॉवरलिफ्टिंगमध्ये प्रतिमा भोंडे यांनी यंदा सुवर्णपदकासह स्पर्धेत सलग दुसर्यांदा पदक जिंकण्याचा पराक्रम नोंदविला आहे.

जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये संपलेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत ३८ वर्षीय अकुताई हिने गोळाफेकमधील एफ ४० प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने ५.७९ मीटर अंतरावर गोळा फेकला. याच प्रकारात महाराष्ट्राच्या रूही शिंगाडेने ४.४३ मीटर फेकी करून कांस्यपदकाची कमाई केली.
स्पर्धेतील अकुताईचे हे दुसरे सुवर्ण ठरले. यापूर्वी तिने थाळीफेकमध्ये १५.८३ मीटर कामगिरीसह सुवर्ण जिंकले होते. गत खेलो इंडिया पॅरा गेम्समध्येदेखील तिने याच दोन्ही प्रकारात सुवर्ण जिंकले होते. मूळ पंढरपूरजवळील शेवते गावची रहिवासी असलेली अकुताई सध्या पुण्यातील आझम कॅम्पस येथे पॅरालिम्पिक पदकविजेता खेळाडू सचिन खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या अकुताईचे आई-वडील शेती करतात. येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवून देशासाठी पदके जिंकण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले.
पॅरालिम्पिक खेळाडू भाग्यश्री जाधव हिने देखील गत खेलो इंडिया पॅरा गेम्स प्रमाणे यावेळीही दोन सुवर्णपदके पटकावली. तिने यावेळीही भालाफेक आणि गोळाफेक प्रकारात अव्वल स्थान प्राप्त केले. भाग्यश्रीने गोळाफेकीत ७.३० मीटर अंतरावर गोळा फेकत दुसरे सुवर्ण पदक पटकावले. भाग्यश्री ही मूळची नांदेड जिल्ह्यातील घोडवडज गावची. १८ वर्षांची असताना ती कोमात गेली. त्यात तिच्या पायाखालील शरीर अधू झाले. सध्या ती पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर रविंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या ५० किलो गटात नागपूरच्या प्रतिमा भोंडे सोनेरी यशाचे वजन पेलले. ३३ वर्षीय प्रतिमाने ८६ किलो वजन उचलून महाराष्ट्राची शान उंचावली. तामिळनाडूच्या गोमाथीने ६५ किलो वजन उचलून रौप्य पदकाची कमाई केली. गोमाथीपेक्षा तब्बल ११ किलो अधिक वजनाची सरस कामगिरी करीत प्रतिमाने केली. गत स्पर्धेत प्रतिमाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.
द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त विजय मुनेश्वर यांच्याकडे गेली वर्ष ती सराव करीत आहे. कॅन्सरमुळे तिच्या आईचे निधन झाल्यापासून नागपूरात एकटी राहूनच प्रतिमा कसून सराव करत असते. बालपणीपासून ती पायाने दिव्यांग आहे. पदक जिंकल्यानंतर प्रतिमा भोंडे हिने सांगितले की दिवंगत आईचे स्वप्न होते की मी देशासाठी पदक जिंकावे. आईच्या स्वप्नपूर्ती मी कष्ट घेत आहे.
भाग्यश्रीचा असाही सुवर्ण षटकार!
३७ वर्षीय भाग्यश्री हिने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुवर्णपदकाचा षटकार झळकावला आहे. सलग दोन खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये प्रत्येकी दोन सुवर्ण तसेच पॅरा ग्रां-प्रीमध्ये दोन सुवर्ण तिने या स्टेडियममध्येच जिंकली आहेत.