सोलापूर संघाने सांगलीला बरोबरीत रोखले

  • By admin
  • March 24, 2025
  • 0
  • 37 Views
Spread the love

भाई नेरूरकर चषक राज्य खो-खो स्पर्धा ः धाराशिव, कोल्हापूर, पुणे, ठाणे, नाशिक संघांचे एकतर्फी विजय

सोलापूर ः भाई नेरूरकर चषक राज्य खो-खो स्पर्धेत पुरुष गटात सलामीच्या सामन्यात सोलापूर संघाने सांगली संघाला बरोबरीत रोखले.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयच्या वतीने इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्रमांक २१च्या मैदानावर सोमवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत सकाळच्या सत्रात हाफ टाइमला १४-१५ अशा पिछाडीवरून सोलापूरच्या खेळाडूंनी बहारदार खेळी करीत २६-२६ अशी बरोबरी केली.

सांगलीकडून अभिषेक केरीपाळे याने आपल्या धारदार आक्रमणात तब्बल दहा गडी बाद करीत १.३० मिनिटे संरक्षण करीत अष्टपैलू खेळी केली. सत्यजित सावंतने १.४० व १.०० मिनिटे संरक्षण केले. सागर गायकवाड यानेही ४ गडी टिपले.

सोलापूरच्या अजय कश्यपने आपल्या धारदार आक्रमणात ७ बळी व १.०० मिनिटे पळती तर जुबेर शेख याने ४ गडी बाद केले. अक्षय इंगळे (१.१९, १.१० मिनिटे संरक्षण व ३ गुण), सौरभ चव्हाण (१.००,१.०० व १.१० मिनिटे व ३ गुण) व अमोल केदार (३ गुण) यांनी संघाच्या बरोबरीत साथ दिली.

नागपूरची किशोर व पुरुष गटात कडवी लढत
किशोरी गटात हाफ टाइमला ३-३ अशा बरोबरीनंतर सोलापूरने नागपूरला १०-८ असे २ गुण आणि दीड मिनिटे राखून नमविले. ऋतुजा सुरवसे हिने पहिल्या डावात तब्बल ५ मिनिटे संरक्षण करीत नागपूरचे संरक्षण खिळखिळे केले. सोलापूरची कर्णधार सृष्टी काळे हिने ४ गडी बाद करीत संघाच्या विजयात साथ दिली. दुसऱ्या डावात कार्तिकी यलमार व मालन राठोड या दोघींनी प्रत्येकी २.३० मिनिटे संरक्षणाची बाजू सांभाळली. नागपूरकडून ठाकरे हिने (२.२० मिनिटे व २ गुण) व दुर्गा धारवाडे हिने (२.१०, १.०० मिनिटे) यांनी लढत दिली.

पुरुष गटातील चुरशीच्या सामन्यात पुण्याविरुद्ध नागपूरने मध्यंतरापर्यंत कडवी लढत दिली. १०-९ अशा एका गुणाच्या आघाडीवरून पुण्याने नागपूरला २४-१६ असे ८ गुणांनी हरविले. पुण्याकडून अनिकेत चिखले (२.००, १.३० मिनिटे व २ गुण), शिवम शिंगाडे १.५०, १.५० मिनिटे) व रितेश कडगी (६ गुण) यांनी संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी केली. नागपूरच्या कोमल महाजन (२.०० मि. व ४ गुण), पियूष नांदूरकर (१.०० मिनिटे व ३ गुण) याने एकाकी लढत दिली. अन्य सर्व सामने एकतर्फी झाले

अन्य निकाल ः किशोर गट ः धाराशिव विजयी विरुद्ध नागपूर १७-६ एक डावाने, कोल्हापूर विजयी विरुद्ध बुलढाणा १९-७ एक डाव १२ गुणांनी.

किशोरी गट ः सांगली विजयी विरुद्ध बुलढाणा १३-९ एक डाव ४ गुणांनी.

महिला गट ः पुणे विजयी विरुद्ध नागपूर १८-९ एक डाव ९ गुणांनी, नाशिक विजयी विरुद्ध रत्नागिरी १३-१० एक डाव ३ गुणांनी, ठाणे विजयी विरुद्ध अकोला १७-१० एक डाव ७ गुणांनी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *