दिल्ली कॅपिटल्स संघाचा रोमहर्षक विजय

  • By admin
  • March 24, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

आशुतोष शर्माची अविस्मरणीय फलंदाजी, लखनौ एका विकेटने पराभूत 

विशाखापट्टणम : नवख्या आशुतोष शर्मा याने अवघ्या ३१ चेंडूत नाबाद ६६ धावांची तुफानी खेळी करत दिल्ली कॅपिटल्स संघाला लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्ध एक विकेट राखून रोमांचक विजय मिळवून दिला. आशुतोष व विपराज  या जोडीने धमाकेदार फटकेबाजी करत पराभवाकडे चाललेली वाटचाल विजयात बदलली.  मिचेल मार्श (७२), निकोलस पूरन (७५) यांच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर लखनौ सुपर जायंट्स संघाने २०९ धावसंख्या उभारूनही त्यांना ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे पराभवाची चव चाखावी लागली. 

दिल्ली कॅपिटल्स संघासमोर विजयासाठी २१० धावांचे आव्हान होते. लखनौ संघाची गोलंदाजी कमकुवत असल्याची चर्चा सातत्याने होत होती. परंतु, शार्दुल ठाकूर याने जेक फ्रेझर मॅकगर्क (१), पोरेल (०) यांना पहिल्याच षटकात बाद करुन दिल्लीला मोठा धक्का दिला. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच समीर रिझवी (४), बाद झाला. 


कर्णधार अक्षर पटेल व फाफ डू प्लेसिस यांनी ४३ धावांची भागीदारी केली. दिग्वेश राठी याने अक्षर पटेलला (२२) बाद करुन आयपीएल स्पर्धेतील पहिला बळी मिळवला. पाठोपाठ रवी बिश्नोई याने फाफ डू प्लेसिस याची १८ चेंडूतील २९ धावांची वेगवान खेळी संपुष्टात आणली. त्याने दोन षटकार व तीन चौकार मारले. फाफ बाद झाल्यानंतर दिल्लीच्या विजयाच्या आशा धुसर बनल्या. 

स्ट्रिस्टन स्टब्सची २२ चेंडूतील ३४ धावांची वेगवान खेळी सिद्धार्थ याने संपुष्टात आली. त्याने तीन उत्तुंग षटकार व एक चौकार मारला. स्टब्स बाद झाल्यानंतर दिल्ली संघाची स्थिती अधिकच खराब झाली. ११३ धावांवर त्यांचे आघाडीचे सहा फलंदाज तंबूत परतले होते. मात्र, त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर आशुतोष शर्मा याने धमाकेदार फलंदाजी करत सामन्यात रोमांच आणला. त्याला विपराज निगम याची शानदार साथ लाभली. विपराज याने अवघ्या १५ चेंडूत ३९ धावांची बहारदार खेळी करत सामना चुरशीचा बनवला. त्याने दोन टोलेजंग षटकार व पाच उत्कृष्ट चौकार मारले. विपराज व आशुतोष शर्मा या जोडीने सातव्या विकेटसाठी ५३ धावांची वेगवान भागीदारी करुन सामन्यात रोमांच आणला. 

१८व्या षटकात रवी बिश्नोई याने स्टार्कला (२) बाद केले. मात्र, त्यानंतर आशुतोषने बिश्नोईची गोलंदाजी फोडून काढत दोन षटकारांसह १७ धावा काढल्या. या षटकाने सामना पुन्हा दिल्लीच्या बाजूने झुकला. मात्र, १९व्या षटकात कुलदीप यादव (५) धावबाद झाला. शेवटच्या षटकात पहिल्याच चेंडूवर ऋषभ पंत याने मोहित याला यष्टीचीत बाद करण्याची सोपी संधी दवडली. त्यानंतर आशुतोष वादळी षटकार ठोकत दिल्लीला रोमहर्षक विजय मिळवून दिला. दिल्ली कॅपिटल्स संघाने १९.३ षटकात नऊ बाद २११ धावा फटकावत विजयी सलामी दिली. या विजयाचा हिरो ठरला तो आशुतोष शर्मा. आशुतोष याने अवघ्या ३१ चेंडूत नाबाद ६६ धावांची धमाकेदार खेळी करत दिल्लीला रोमहर्षक विजय मिळवून दिला. त्याने पाच टोलेजंग षटकार व पाच चौकार ठोकत सामना अविस्मरणीय बनवला. लखनौ संघाकडून शार्दुल ठाकूर (२-१९), सिद्धार्थ (२-३९), दिग्वेश राठी (२-३१), रबी बिश्नोई (२-५३) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. 

मार्श, पूरनचा जलवा

प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने २०९ धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व मिळवले. लखनौच्या मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. मिचेल मार्श तर शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजांवर तुटून पडला होता. लखनौच्या संघाने ज्या पद्धतीने सुरुवात केली, त्यावरून असे दिसते की संघाने अजूनही २०-२५ धावा कमी केल्या आहेत. पूरन आणि मार्श वगळता लखनौचा दुसरा कोणताही फलंदाज
चांगली कामगिरी करू शकला नाही ही गोष्ट निश्चितच खटकणारी आहे. 

लखनौ संघाकडून मिचेल मार्श याने डावाची सुरुवात आक्रमक केली. त्याने फक्त २१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्याच्या वादळी खेळीत त्याने ३६ चेंडूत ७२ धावा केल्या. संपूर्ण डावात त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याच्याशिवाय निकोलस पूरन यानेही दिल्लीच्या गोलंदाजांवर कहर केला. त्याने ३० चेंडूत ७५ धावा केल्या आणि त्याच्या डावात ६ चौकार आणि ७ षटकारही मारले. कर्णधार ऋषभ पंतला त्याचे खातेही उघडता आले नाही, तो खाते न उघडताच ६ चेंडू खेळून बाद झाला. षटकार मारण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर सोपा झेल देऊन पंत तंबूत परतला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती. पंतचा हा कर्णधार म्हणून ५० वा टी २० सामना होता हे विशेष. कुलदीपने त्याला बाद करुन त्यांच्या धावगतीला ब्रेक लावला. 

लखनौ सुपर जायंट्सने १५ षटकांत १७० धावा केल्या होत्या आणि संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता. पण येथून दिल्लीच्या गोलंदाजांनी कहर करायला सुरुवात केली. शेवटच्या ५ षटकांत लखनौच्या फलंदाजांना फक्त ३९ धावा करता आल्या. या सामन्यात लखनौकडून आयुष बदोनीने चार, शाहबाज अहमदने नऊ आणि डेव्हिड मिलरने नाबाद २७ धावा केल्या. पंत व्यतिरिक्त शार्दुल ठाकूर आणि रवी बिश्नोई यांनी एकही धाव काढली नाही. दिग्वेश राठी खाते न उघडता नाबाद राहिला.

मिचेल स्टार्कची प्रभावी गोलंदाजी
मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिटल्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. सुरुवातीला तो थोडा महागडा ठरला, पण त्याने ४ षटकांत ४२ धावा देत ३ बळी घेतले. निकोलस पूरन, जो त्याच्या बॅटने आग ओकत होता, त्याला स्टार्क याने क्लीन बोल्ड केले. याशिवाय त्याने शाहबाज अहमद आणि रवी बिश्नोई यांचे बळीही घेतले. कुलदीप यादवने २० धावांत दोन गडी बाद करुन आपला प्रभाव दाखवला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *