
डार्क महिला संघाचा दोन धावांनी पराभव, यशोदा घोगरे सामनावीर
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर महिला संघाने अटीतटीच्या सामन्यात डार्क महिला संघावर अवघ्या दोन धावांनी रोमांचक विजय मिळवला. या सामन्यात यशोदा घोगरे हिने सामनावीर किताब संपादन केला.
किंग्ज स्पोर्ट्स क्लब मैदानावर हा सामना झाला. छत्रपती संभाजीनगर महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत ४३.५ षटकात सर्वबाद २१४ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना डार्क महिला संघ ५० षटकात सहा बाद २१२ धावा काढू शकला. छत्रपती संभाजीनगर महिला संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या हा सामना दोन धावांनी जिंकला.
या सामन्यात मानसी तिवारी हिने १०५ चेंडूत ९४ धावांची धमाकेदार खेळी केली. मानसीचे शतक अवघ्या सहा धावांनी हुकले. तिने दहा चौकार मारले. जिया सिंग हिने ९६ चेंडूत ८४ धावांची बहारदार खेळी केली. तिने १३ चौकार मारले. श्रुती पवार हिने पाच चौकारांसह ३६ धावांची जलद खेळी केली. गोलंदाजीत निकिता जोंधळे हिने २८ धावांत चार विकेट घेत आपला ठसा उमटवला. निती अग्रवाल हिने २८ धावांत चार विकेट घेत सामना गाजवला. दिव्या जाधव हिने २७ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः छत्रपती संभाजीनगर महिला संघ ः ४३.५ षटकात सर्वबाद २१४ (जिया सिंग ८४, श्रावणी निटूरकर ७, शितल देशमुख ५, माधुरी अघाव २२, श्रुती पवार ३६, यशोदा घोगरे ३२, इतर २२, निती अग्रवाल ४-२८, निकिता जोंधळे ४-२८, सृष्टी सूर्यवंशी १-२३, सुजाता हिंगमिरे १-१५) विजयी विरुद्ध डार्क महिला संघ ः ५० षटकात सहा बाद २१२ (सृष्टी सूर्यवंशी ९, सहज कौर ११, शुभांगी पाटोळे ३४, निती अग्रवाल १०, मानसी तिवारी ९४, स्वरांजली मराळ नाबाद ३१, इतर २३, दिव्या जाधव २-२७, यशोदा घोगरे १-३३, भूमिका चव्हाण १-३७, श्रुती पवार १-५६). सामनावीर ः यशोदा घोगरे.