प्रशांत सुतार महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे नवे अध्यक्ष

  • By admin
  • March 25, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

मुंबई ः माजी राष्ट्रीय टेनिसपटू, प्रमाणित टेनिस प्रशिक्षक आणि दक्षिण आशियातील एकमेव एटीपी २५० टेनिस स्पर्धा असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्रचे माजी स्पर्धा संचालक प्रशांत सुतार यांची महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

सांगली शहरातून खेळाडू म्हणून टेनिस कारकिर्दीची सुरुवात करणारे प्रशांत सुतार यांनी भरत ओझा यांच्याकडून अध्यक्षपदाची सुत्रे नुकतीच स्वीकारली. ओझा यांची महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या व्यवस्थापकीय परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.

एसएसएलटीए परिषदेचे सदस्य असलेले सुतार महाराष्ट्र सरकारशी जुळवून समन्वय साधून डेव्हिस करंडक, एटीपी, डब्ल्यूटीए स्पर्धांसह प्रमुख आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा सुरू करण्यात आघाडीवर आहेत. नागपूर येथील एमएसएलटीएच्या महत्वाकांक्षी आदिवासी प्रकल्पातही प्रशांत सुतार यांचा सहभाग होता. सुतार यांनी आपल्या व्यावसायिक कंपनीच्या माध्यमातून रोहन बोपण्णा, सुमित नागल, अनिरुद्ध चंद्रशेखर आणि अन्य कुमार खेळाडूंना प्रायोजित केले आहे.

पुणे जिल्ह्यातील बहुराष्ट्रीय कंपनी आर्यन्स पंप्स अँड एन्व्हायरो सोल्युशनचे प्रशांत सुतार अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी सर्वात आव्हानात्मक पर्यावरणीय स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी सरलीकृत उपाय विकसित करण्याचे काम करते. गाळ काढून टाकण्यासाठी आणि गटार तसेच कालवे स्वच्छ करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानासह विशेष उद्देश वाहनांवर बसवता येतील अशी मशीनही सुतार यांची कंपनी तयार करते.

प्रशांत सुतार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी आणि मानद सचिव राजीव देसाई यांनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *