राज्य कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर, मुंबई उपनगर पश्चिम विजेते

  • By admin
  • March 25, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

ठाणे : ७२ व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूर आणि महिला गटात मुंबई उपनगर पश्चिम या संघांनी विजेतेपद पटकावले.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशएनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले होते. ठाणे पश्चिम येथील कॅडबरी कंपनी जवळील भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी क्रीडांगणार झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर संघाने अहिल्यानगर संघाचा ४२-३२ असा पराभव करीत दोन तपाच्या कालावधीनंतर “श्रीकृष्ण करंडक” फिरत्या चषकाबरोबर मुख्यमंत्री चषकावर आपले नाव कोरले.

शिरोळ, कोल्हापूर येथे २००३ साली झालेल्या स्पर्धेत त्यांनी पुण्याला पराभूत करीत पहिल्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. पुणे येथे २००४ साली झालेल्या व कराड, सातारा येथे २०१७-१८ साली झालेल्या स्पर्धेत ते उपविजेते ठरले होते. उपविजेत्या अहिल्यानगर संघाने सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक दिली. पण फेब्रुवारी २०२२ साली काल्हेर, भिवंडी, ठाणे येथे झालेल्या स्पर्धेत ते विजेते ठरले होते. त्यानंतर सलग ३ वर्षे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागत आहे.

कोल्हापूरने सावध सुरुवात करीत अहिल्यानगर संघावर पहिला लोण देत विश्रांतीला १८-१३ अशी आघाडी घेतली. कोल्हापूरने विश्रांतीनंतर आपला खेळ अधिक गतिमान केला. त्यांच्या सौरभ फागरे याने एकाच चढाईत ३ गडी टिपत व शिलकी गड्याची पकड करीत दुसरा लोण देत २६-१६ अशी आपली आघाडी वाढविली. पुन्हा त्यांच्या साहिल पाटीलने एकाच चढाईत ४ गडी टिपत तिसरा लोण देत आपली आघाडी ३८-२४ अशी भक्कम केली. शेवटची पाच मिनिटे पुकारली तेव्हा ४०-२७ अशी कोल्हापूर कडे आघाडी होती. शेवटी १० गुणांच्या फरकाने कोल्हापूरने आपल्या दुसऱ्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

कोल्हापूरच्या विजयात सौरभ व साहिलला चढाईत ओंकार पाटील तर पकडीत दादासाहेब पुजारी व अविनाश चारपले यांची भक्कम साथ लाभली. कोल्हापूरचा संपूर्ण स्पर्धेत बचाव भक्कम झाला. आदित्य शिंदे, सौरभ राऊत यांना चढाईत एकूण १३ बोनस गुण घेतले. पण त्यांचा बचाव अगदीच सुमार दर्जाचा झाला. त्यांच्या पराभवाचे हेच मूळ कारण ठरले. सोमनाथ बेडकेने काही बऱ्या पकडी केल्या.

महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर पश्चिम संघाने ५-५ चढायांत मुंबई उपनगर पश्चिम संघाचा कडवा प्रतिकार ३३-३२ असा मोडून काढत “पार्वतीबाई सांडव” फिरता चषक व मुख्यमंत्री चषक आपल्याकडे खेचून आणला. कराड, सातारा येथे २०१७-१८ साली झालेल्या स्पर्धेत उपनगरने विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर त्यांना हे यश मिळाले. मुंबई उपनगरचे हे तिसरे विजेतेपद आहे.

सामन्याच्या पहिल्या चढाई पासून चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात पूर्वार्धात १२-११ अशी मुंबई उपनगर संघाकडे आघाडी होती. उत्तरार्धात मुंबई उपनगरने शेवटच्या काही मिनिटात सोनालीची पकड करीत मुंबईवर लोण देत आघाडी घेतली. सोनालीची ही पकड चढाईची कालमर्यादा संपल्याने यशस्वी झाली. पूर्ण डावात झालेला हा एकमेव लोण. शेवटी हा सामना २७-२७ असा बरोबरीत संपला. सामन्याचा निकालाकरिता दोन्ही संघांना प्रत्येकी ५-५ चढाया देण्यात आल्या. त्यात उपनगरने चढाईत ५ गुण व पूजा यादवची पकड करीत ६ गुण घेत बाजी मारली. पूजाची पकड मुंबई शहराला पराभवाच्या खाईत घेऊन गेली.

उपनगराच्या या विजयाचे श्रेय कोमल देवकर, प्रतिक्षा पन्हाळकर यांच्या संयमी चढाया, तर प्रणाली नागदेवता, करीना पाटील यांच्या भक्कम बचावाला जाते. सोनाली शिंगटे, पूजा यादव, पौर्णिमा जेधे, साधना विश्वकर्मा यांनी मुंबईच्या विजया करिता अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत दिली.. या अगोदर झालेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात मुंबई उपनगर पश्चिम संघाने मुंबई शहर पूर्वचा, तर मुंबई शहर पश्चिमने पुणे शहरचा पाडाव करत अंतिम फेरीत धडक दिली होती. पुरुषांच्या उपांत्य सामन्यात कोल्हापूरने पुणे ग्रामीणचा तर अहिल्यानगर संघाने मुंबई शहर पूर्वचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *