
मुंबई : जेएसडब्लू इंडियन ओपन स्क्वॉश कॉपर स्पर्धेत भारताची युवा खेळाडू तन्वी खन्ना हिने हाँग काँगच्या खेळाडूवर ३३ मिनिटात मात करताना विजयी सलामी दिली. मात्र पहिल्या दिवसावर सहा इजिप्शियन खेळाडूंनी एकतर्फी विजयांची नोंद करताना वर्चस्व गाजवले.
बॉम्बे जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या दिवशी अन्य भारतीय खेळाडू पराभव पत्करत असताना तन्वी खन्नाने मात्र हाँग काँगच्या टोबिसे वर ११-०८, ११-०८, ०६-११, ११-०७ अशा विजयाची नोंद केली. केवळ ३३मिनिटात हा सामना जिंकणाऱ्या तन्वीचा सामना पुढच्या फेरीत अव्वल मानांकित आकांक्षा साळुंके हिच्याशी असणार आहे.
पुरुष गटात भारताच्या आठव्या मानांकित वीर चोत्रानीने भारताच्या सुरज कुमार चांदविरुद्ध कौशल्य पणाला लावूनही त्याला पराभवाचा सामना करावा लागला. सुरज कुमार याने हा सामना ११-०६, ११-०७, ११-०२ असा सहज जिंकून दुसरी फेरी गाठली. त्याचवेळी भारताच्या ओम सेमवाल याला इजिप्तच्या करीम टोर्की कडून ०६-११, ०५-११, ०८-११ असा २५ मिनिटात पत्करावा लागला. तसेचमहिला गटात भारताच्या निरुपमा दुबेला इजिप्तच्या नूर रामी हिच्याविरुद्ध २-२ अशा बरोबरी नंतर ११-०७, ११-०१, ०५-११,०८-११, ११-०७ असा निसटता पराभव पत्करावा लागला.
महिला गटात हाँगकाँगच्या हेलेन टॅगने जपानच्या एरिसा सानोवर ११-०८, ११-०९, ०९-११, ११-०८ असा विजय मिळवला., तर दुसऱ्या सत्रात इजिप्तच्या सलमा एल आलफीने जपानच्या रीसा सुगीमोटोचा ०६-११, ११-०५, १२-१०, ११-०९ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
इजिप्तच्या मालेक फॅथीने फ्रांसच्या लिया बार्ब्युचा केवळ २३ मिनिटात ११-०६, ११-०२, ११-०७ असा धुव्वा उडविला.