अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राची प्रथमच २३ पदकांची लयलूट, ईश्वरचा सुवर्ण वेध

  • By admin
  • March 25, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

नवी दिल्ली : खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी १० सुवर्ण पदकांसह एकूण २३ पदकांची लयलूट करीत दमदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. महाराष्ट्रासाठी दहावे सुवर्णपदक पुण्याच्या ईश्वर टाक याने भालाफेक प्रकारात पटकावले.

जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये संपलेल्या अ‍ॅथलेटिक्सच्या मैदानात अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या यशाचा झेंडा फडकविला. महाराष्ट्राने पॅरा स्पर्धेत प्रथमच १० सुवर्ण, ६ रौप्य व ७ कांस्य पदकांसह एकूण २३ पदकांची कमाई केली आहे. गतस्पर्धेत अ‍ॅथलेटिक्समध्ये ७ सुवर्णांसह एकूण १६ पदकांची कमाई केली होती. 

अकुताई उनभगत, भाग्यश्री जाधव यांनी दुहेरी पदकाचा पराक्रम करीत अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजवले. प्रथमच पॅरा स्पर्धेत खेळताना १२ खेळाडूंनी पर्दापणातच पदक जिंकण्याचा करिश्मा घडविला. दिल्ली दौर्‍यावर आलेले क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पथक प्रमुख मिलिंद दीक्षित यांनी खेळाडूंचे कौतुक केले आहे.

अ‍ॅथलेटिक्सच्या एफ १२ या प्रकारात २५ वर्षीय ईश्वरने ६२.६६ मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरले. भालाफेकमध्येच एफ १३ या प्रकारात महाराष्ट्राच्या प्रतीक पाटील याने कांस्यपदक मिळवले. त्याने ४९.०१ मीटर कामगिरी नोंदवली. ईश्वराचा उजवा डोळा पूर्णपणे निकामी असून त्याच्या डाव्या डोळ्याचीही ५० टक्के दृष्टी गेलेली आहे. येत्या काळात वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करणार असल्याचे त्याने सांगितले.

कोल्हापूरच्या स्नेहल बेनाडे हिने महिलांच्या गोळाफेकमध्ये एफ १२/१३ प्रकारात महाराष्ट्रासाठी रौप्यपदक जिंकले. तिने ७.४० मीटर अंतरावर गोळा फेकला. २० वर्षीय स्नेहल सध्या गोवा येथे आयआयटीमध्ये अभियांत्रिकीच्या दुसर्‍या वर्षाला शिकत आहे. स्नेहल तीन वर्षांची होती तेव्हा भावासोबत खेळत होती. हातातील बांगडी क्रशरमध्ये गेली म्हणून ती काढण्याचा नादात स्नेहलने आपला डावा हात गमावला. दीड वर्षापूर्वीपासून तिने गोळाफेक करायला सुरुवात केली. खेळ आणि करिअर दोन्ही सुरू ठेवण्याचा मानस तिने व्यक्त केला.

महिलांच्या एफ ५६ प्रकारात मीना पिंगाने हिने १७.०३ मीटर थाळीफेक करत तिसरे स्थान मिळवले. राजश्री कासदेकर हिने भालाफेक प्रकारात एफ १२, १३ प्रकारात २०.२४ मीटर कामगिरीसह कांस्यपदक प्राप्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *