
अनुजा पाटील, पूनम खेमनार सामनावीर
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय ट्रॉफी लीग क्रिकेट स्पर्धेत ज्युडिशियल महिला संघ आणि कोल्हापूर महिला संघ यांनी चमकदार कामगिरी बजावत अंतिम फेरी गाठली आहे. ज्युडिशियल संघाच्या पूनम खेमनार व कोल्हापूरच्या अनुजा पाटील यांनी सामनावीर किताब संपादन केला.
पहिल्या उपांत्य सामन्यात ज्युडिशियल महिला संघाने नाशिक महिला संघाचा ४५ धावांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. वीरांगण क्रिकेट अकादमी मैदानावर हा सामना झाला. ज्युडिशियल महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत ३२.४ षटकात सर्वबाद १५८ असे माफक लक्ष्य उभे केले. परंतु, त्यांच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत नाशिक महिला संघाला ३४.१ षटकात ११३ धावांवर रोखून अंतिम फेरी गाठली.
या सामन्यात पूनम खेमनार हिने ४८ चेंडूत ५४ धावांची शानदार खेळी केली. पूनमने दोन उत्तुंग षटकार व पाच चौकार मारले. सायली लोणकर हिने ४५ चेंडूत ३९ धावा फटकावल्या. सायलीने सहा चौकार मारले. रसिका शिंदे हिने तीन चौकारांसह २८ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत प्रियंका घोडके हिने ३५ धावांत चार विकेट घेतल्या. प्रज्ञा वीरकरहिने २२ धावांत तीन गडी बाद केले. पूनम खेमनार हिने २३ धावांत दोन गडी बाद करत अष्टपैलू कामगिरी बजावली.
दुसऱया उपांत्य सामन्यात कोल्हापूर संघाने एमसीए ब्लू संघावर ९३ धावांनी दणदणीत विजय साकारत अंतिम फेरी गाठली. कोल्हापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना ३९ षटकात सहा बाद २८४ अशी भक्कम धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. एमसीए ब्लू संघ ३९ षटकात नऊ बाद १९१ धावा काढू शकला. कोल्हापूरने तब्बल ९३ धावांनी विजय साकारला.
या सामन्यात अनुजा पाटील हिने ७५ चेंडूत ११६ धावांची बहारदार खेळी केली. तिने दोन षटकार व १७ चौकार ठोकत सामना गाजवला. शिवाली शिंदे हिने ८० धावांची उत्कृष्ट खेळी केली. तिने ११ चौकार व एक षटकार मारला. गायकवाड हिने ४४ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत सुषमा पाटील हिने ४७ धावांत चार विकेट घेतल्या. अभिलाषा पाटील हिने २२ धावांत दोन तर मधुरा इंगवले हिने २५ धावांत दोन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
१) ज्युडिशियल महिला संघ ः ३२.४ षटकात सर्वबाद १५८ (गौतमी नाईक ८, प्रज्ञा वीरकर २२, शरयू कुलकर्णी ११, पूनम खेमनार ५४, सायली लोणकर ३९, इतर १९, प्रियंका घोडके ४-३५, श्रुती गिते २-२६, रसिका शिंदे १-३०, ऐश्वर्या वाघ १-२९) विजयी विरुद्ध नाशिक महिला संघ ः ३४.१ षटकात सर्वबाद ११३ (तेजस्विनी बटवाल १२, श्रुती गिते ९, शाल्मली क्षत्रिय ८, प्रियंका घोडके १८, रसिका शिंदे २८, ऐश्वर्या वाघ १४, प्रज्ञा वीरकर ३-२२, पूनम खेमनार २-२३, एकता १-२७, सायली लोणकर १-९, गौतमी नाईक १-२०). सामनावीर ः पूनम खेमनार.
२) कोल्हापूर महिला संघ ः ३९ षटकात सहा बाद २८४ (अंकिता भारती १०, गायकवाड ४४, शिवाली शिंदे ८०, अनुजा पाटील ११६, इतर २९, सुषमा पाटील ४-४७, सिरमन डबास १-३५) विजयी विरुद्ध एमसीए ब्लू संघ ः ३९ षटकात नऊ बाद १९१ (स्नेहा ४१, सिरमन डबास ७, निहीरा शर्मा ७, समृद्धी १५, आदिती वाघमारे ३४, ऋतुजा काळे ३६, सुषमा पाटील नाबाद १२, प्रांजल पवार नाबाद १२, इतर २२, अभिलाषा पाटील २-२२, सेजल सुतार २-३८, मधुरा इंगवले २-२५, परिणीता पाटील १-१३, अनुजा पाटील १-३५). सामनावीर ः अनुजा पाटील.