
श्रेयस अय्यरची घणाघाती फलंदाजी; साई सुदर्शन, जोस बटलर, रदरफोर्डची दमदार खेळी व्यर्थ
अहमदाबाद : कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद ९७ धावांच्या घणाघाती खेळीच्या बळावर पंजाब किंग्ज संघाने गुजरात टायटन्स संघावर ११ धावांनी विजय नोंदवला. साई सुदर्शन (७४), जोस बटलर (५४), रदरफोर्ड (४६) यांच्या आक्रमक फलंदाजीनंतरही गुजरातला आयपीएलच्या नव्या हंगामात पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.
पंजाब संघाने गुजरात संघासमोर विजयासाठी २४४ असे मोठे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाच्या साई सुदर्शन व कर्णधार शुभमन गिल या सलामी जोडीने ५.५ षटकात ६१ धावांची आक्रमक भागीदारी करुन संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. मॅक्सवेल याने गिलची १४ चेंडूतील ३३ धावांची आक्रमक खेळी संपुष्टात आणली. गिलने तीन टोलेजंग षटकार व दोन चौकार मारले.

गिल बाद झाल्यानंतर साई सुदर्शन व जोस बटलर या जोडीने ८४ धावांची भागीदारी करत विजयाची आशा पल्लवित ठेवली. अर्शदीप सिंग याने साई सुदर्शन याला ७४ धावांवर बाद करुन मोठा अडथळा दूर केला. साई याने ४१ चेंडूत सहा उत्तुंग षटकार व पाच चौकार मारले. साईची विकेट घेतल्यानंतर पंजाब संघ थोडा वरचढ वाटू लागला. मात्र, जोस बटलर व शेरफेन रदरफोर्ड या धमाकेदार फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी करत पंजाब गोलंदाजांवर दबाव वाढवला.
विजयकुमार वैशाख याने दोन षटके अचूक टाकत गुजरात संघाच्या धावगतीला ब्रेक लावला. बटलर ३३ चेंडूत ५४ धावांची आक्रमक खेळी करुन बाद झाला. त्याने चार चौकार व दोन षटकार मारले. जॅनसेन याने बटलरची विकेट घेऊन गुजरात संघाचा पराभव निश्चित केला. १२ चेंडूत ४५ धावांची गुजरातला आवश्यकता होती. त्यावेळी रदरफोर्ड आणि राहुल तेवतिया यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर तेवतिया (६) दुर्देवीरित्या धावबाद झाला. त्यानंतर अर्शदीपने रदरफोर्डला (२८ चेंडूत ४६, तीन षटकार, चार चौकार) क्लीन बोल्ड करुन संघाचा विजय निश्चित केला. गुजरातने २० षटकात पाच बाद २३२ धावा फटकावत सामन्यातील रोमांच अखेरपर्यंत कायम ठेवला.
पंजाब संघाकडून अर्शदीप सिंग (२-३६), मार्को जॅनसेन (१-४४), ग्लेन मॅक्सवेल (१-२६) यांनी विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
श्रेयस अय्यरची घणाघाती फलंदाजी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्ज संघाने २० षटकात पाच बाद २४३ धावसंख्या उभारली. त्यात कर्णधार म्हणून पंजाबकडून पहिला सामना खेळताना श्रेयस अय्यर याने नाबाद ९७ धावांची घणाघाती खेळी केली. अय्यर याने सर्व गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने तब्बल ९ टोलेजंग षटकार व पाच चौकार ठोकले. दुर्दैवाने अय्यर त्याचे आयपीएलमधील पहिले शतक साजरे करु शकला नाही. याचे मुख्य कारण ठरला तो शशांक सिंग. शशांक सिंग याने शेवटच्या षटकात आक्रमक फलंदाजी करत पाच चौकार ठोकले. त्यामुळे अय्यरला फलंदाजीची संधी मिळू शकली नाही. त्यामुळे नाबाद ९७ धावांची खेळी करुन त्याला तंबूत परतावे लागले. शशांक सिंग याने १६ चेंडूत नाबाद ४४ धावांची तुफानी खेळी केली. त्याने दोन षटकार व सहा चौकार मारले.
प्रियांश आर्य याने डावाची सुरुवात तुफानी केली. प्रियांश याने रबाडाच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली. त्याने २३ चेंडूत ४७ धावा फटकावल्या. त्याने दोन षटकार व सात चौकार मारले. स्टोइनिस याने १५ चेंडूंचा सामना करत दोन षटकार व एक चौकार मारला. अझमतुल्लाह याने एक षटकार व दोन चौकारांसह १६ धावांचे योगदान दिले. मॅक्सवेल शून्यावर पायचीत बाद झाला. प्रभसिमरन (५) लवकर तंबूत परतला. श्रेयस अय्यरच्या नाबाद ९७ धावांच्या बहारदार खेळीने क्रिकेट चाहत्यांना मोठा आनंद मिळवून दिला. २० षटकात पाच बाद २४३ ही पंजाब संघाची आयपीएल स्पर्धेतील दुसरी सर्वाधिक धावसंख्या आहे. गतवर्षी केकेआर संघाने दोन बाद २६२ धावसंख्या उभारली होती.
गुजरात संघाकडून साई किशोर हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३० धावांत दोन गडी बाद केले. रबाडा याने ४१ धावांत एक बळी घेतला. रशीद खान याने एक विकेटसाठी ४८ धावा मोजल्या.