
रोहित शर्मा, दिनेश कार्तिकला टाकले मागे
अहमदाबाद ः आयपीएल स्पर्धेच्या नव्या हंगामात पहिल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल शून्यावर बाद झाला. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात ग्लेन मॅक्सवेल याला मोठा धक्का बसला. तो खाते न उघडता पॅव्हेलियन मध्ये परतला. यासह, त्याने आपल्या नावावर एक अवांछित विक्रम नोंदवला.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात संघाने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पंजाबकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मॅक्सवेल खाते न उघडता बाद झाला. त्याला साई किशोरने एलबीडब्ल्यू आउट केले. यासोबतच ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवण्यात आला. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज बनला. आयपीएलमध्ये तो खाते न उघडता बाद होण्याची ही १९ वी वेळ होती.
आरसीबीने त्याला रिटेन केले नाही
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी आरसीबीने मॅक्सवेलला रिलीज केले होते. त्यानंतर पंजाबने त्याला ४.२ कोटी रुपयांना खरेदी केले. गेल्या हंगामात त्याने नऊ सामन्यांमध्ये ५.७७ च्या सरासरीने फक्त ५२ धावा केल्या आणि त्याचा सर्वोत्तम धावसंख्या २८ धावा होती. मॅक्सवेललाही चेंडूने प्रभाव पाडता आला नाही, त्याने ८.०६ च्या इकॉनॉमी रेटने फक्त सहा विकेट्स घेतल्या.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले फलंदाज
ग्लेन मॅक्सवेल ः १९
रोहित शर्मा ः १८
दिनेश कार्तिक ः १८
पियुष चावला ः १६
सुनील नेरन ः १६