
क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक बंधू-भगिनींनी आता जागरुक होण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाच्या माध्यमातून पुन्हा सर्वांनी एकजूट होऊन लढण्याची गरज आहे. पवित्र पोर्टलद्वारे खरेच आपल्याला व आपल्या नवीन क्रीडा शिक्षक होऊ पाहणाऱ्या बांधवांना फायदा होणार आहे का ? हा लढा आता सर्वांनी मिळून हातात घ्यायची वेळ आलेली आहे. किती वर्षे आपण संघर्ष करत राहायचं? असे आपल्याला वाटते. परंतु, आज आरटीआय, पत्र व्यवहार, गाठी-भेटी आणि वेळ खासगी आयुष्यात अशांसाठी फार मोठी तडजोड करावी लागत आहे.
शारीरिक शिक्षक हद्दपार होण्यास फक्त आपण जबाबदार आहोत हे नाकारून चालणार नाही. १९६८ मध्ये महाविद्यालयात व २०१५ मध्ये शाळेतून शारीरिक शिक्षण वगळले आहे. हे शासन करू शकले कारण आपण एकत्र नाहीत. अनेक शासकीय वरिष्ठ अधिकारी हे शारीरिक शिक्षण या विषयासाठी असहमत आहेत. त्यांच्या मते आपण अकार्यक्षण आहोत. आपल्या असण्याने विद्यार्थ्यांचा कसलाही विकास होत नाही, मग का आपल्याला नेमावेत ? का आपला विषय राबवावा ?
आपण शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या बळावर आज स्वत:ला सिद्ध केले आहे. पण आपण आपल्या आत्म्यास हा सवाल करत नाही की माणूस म्हणून मी योग्य वागत आहे का? चांगल्याला चांगला म्हणणं हे तरी मी करत आहे का? मी वेळ देण्यास तयार नाही. मी कसलीही आर्थिक मदत करण्यास तयार नाही. हे ही ठीक…
पण मी कोणत्याही मीटिंगला उपस्थित राहणार नाही….चला हे पण ठीक….
आपल्या विषयाची पोस्ट आली ती नजरेआड करणार, कसलाही प्रतिसाद देणार नाही.. आडमुठेपणाने वागणार… सांगितल्या शिवाय कसलाही उपक्रम वा काम करणार नाही, कधीही कुणाला सदर गोष्टींबद्दल माहिती देणार नाही वा सांगणार नाही…. मी भला, माझी नोकरी भली !,
पगार वाढ, डीए बोनस या शिवाय कुठलाही विषयाबद्दल बोलणार नाही, शारीरिक शिक्षण विषय तर काही एक वर्ष लांब राहिला.. आझादीच्या अमृत वर्षापर्यंत हे आयुष्य, त्यात काय साध्य करू पाहत आहोत? येऊ घातलेले नवीन शैक्षणिक धोरण आणि त्यामध्ये आपल्या विषयाला असलेले स्थान.. ज्युनियर, सीनियर, अनुदानित विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यीत, कायम विनाअनुदानित, ते अतिथी शिक्षकांपर्यंत येऊन ठेपलेला हा प्रवास पाहता जागे व्हा, माणूस म्हणून जगा….आपण सर्व एकजूट होऊ या त्यातच आपलं सर्वांचं भलं आहे…
- प्रमोद वाघमोडे, अध्यक्ष,
ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ.