
लेखक रघुनंदन गोखले यांच्या पुस्तकाचे खेळाडू-पालकांच्या हस्ते प्रकाशन
पुणे ः द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले यांच्या बुद्धिबळ जगाची रोचक सफर घडवणाऱया पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील मोरेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या खास समारंभात करण्यात आले. गोखले यांनी आपल्या ६४ घरांच्या गोष्टी या पुस्तकात अनेक रोचक कथा सांगितल्या आहेत.

प्रकाशन समारंभ ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांच आई-वडील प्रकाश कुंटे, मीनल कुंटे आणि जयंत आणि चंद्रशेखर गोखले यांचे आई-वडील सुरेश गोखले, जयश्री गोखले आणि अनुपमा अभ्यंकर-गोखले यांची आई सुनंदा अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आले. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर, सकाळचे सहयोगी संपादक सुरेंद्र पाटसकर, राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे, लेखक राजीव तांबे यांची उपस्थिती होती.

प्रख्यात नाट्यकर्मी अतुल पेठे यांनी पुस्तकातील काही उतारे वाचून प्रेक्षकांच्या टाळ्या घेतल्या तर शिव छत्रपती पुरस्कार विजेते जयंत गोखले यांनी आपले गुरू रघुनंदन यांच्या पुस्तकावर केलेले काव्य वाचून दाखवले. माजी राष्ट्रीय विजेत्या मृणालिनी कुंटे च्या भाषणाने सर्व प्रेक्षकांना जुन्या काळात नेले.
प्रमुख पाहुणे गिरीश कुबेर यांनी पुस्तकाची आणि विशेष करून पुस्तकात दडलेल्या अनेक गोष्टींची स्तुती केली. कुबेर म्हणाले की रघुनंदन गोखले यांनी प्रशिक्षक असूनही थोडाही उपदेश केलेला नाही. जे काही सांगितले आहे ते कथा या स्वरूपात येते. पुस्तकाला ग्रँडमास्टर अभिजित कुंटे याने प्रस्तावना लिहिली आहे.
पुस्तकात जर तुमच्या जवळ प्रशिक्षक नसला तर राज्य पातळीपर्यंत कसे पोचता येईल याचे मार्गदर्शन आहे. तसेच पोलगार कुटुंबीयांनी आपल्या तीन मुलींना ग्रँडमास्टर कसे बनवले याची पण माहिती आहे. रशियन चित्रपटातील बुद्धिबळात जगज्जेता कॅपाब्लांका नायिकेला बुद्धिबळाच्या कशी आवड लावतो याचे दृश्य आहे. चालत्या बोलत्या कॅपाब्लांकाला बघून मी थरारून गेलो असे अभिजितने प्रस्तावनेत लिहिले आहे. पुस्तकात मीर सुलतान खान, विश्वनाथन आनंद, आलेखाइन कार्लसन अशी व्यक्तिचित्रे आहेतच पण गुकेश याच्या जगज्जेतेपदाच्या लढतीचा थरार पण आहे. माजी जगज्जेता कार्पोव हा केजीबी चा गुप्तहेर होता ही नवी माहिती पण आपल्याला मिळते.
रघुनंदन गोखले यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी पराग करंदीकर, सुरेंद्र पाटसकर, सदानंद बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, सजनदास जोशी, ईशा करवडे, मृणालिनी कुंटे-औरंगाबादकर, आकांक्षा हगवणे, जयंत गोखले, सुनील बाब्रस, सुजाता बाब्रस यांचा सन्मान करण्यात आला.
Thank you so much sir 🙏🏼