
नवी दिल्ली ः ग्रीसमधील कोस्टा नॅव्हरिनो येथे झालेल्या १४४ व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती सत्रादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी जागतिक फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांची भेट घेतली. इन्फँटिनोने जय शाहसोबतच्या भेटीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
“आयसीसी अध्यक्ष आणि एक उत्तम प्रशासक जय शाह यांना भेटून आनंद झाला,” इन्फँटिनो यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. २०२३ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारताला भेट दिल्यानंतर, तिथल्या लोकांमध्ये क्रिकेटबद्दल असलेली अविश्वसनीय आवड आणि जय शाह यांनी खेळ पुढे नेण्यासाठी केलेल्या अद्भुत कार्याची मला जाणीव आहे. तुमच्या ध्येयासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि क्रिकेटला अधिक जागतिक बनवण्यासाठी एकत्र काम करण्यास आणि सहकार्य करण्यास उत्सुक आहे.
या वर्षी जानेवारीमध्ये शाह यांनी लॉसने येथे आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख यांची भेट घेतली. यादरम्यान, लॉस एंजेलिस २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. बाक यांचा कार्यकाळ या वर्षी २३ जून रोजी संपत आहे. त्यांच्या जागी, क्रिस्टी कोव्हेंट्री यांची आयओसीच्या नवीन अध्यक्षपदी निवड झाली आहे.