
सांगली ः श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा भोसे येथील सातवी इयत्तेतील विद्यार्थी खेळाडू निखिल अशोक तांबे याने पाच तास दहा मिनिटांमध्ये ५१ किलोमीटर रनिंग यशस्वीरित्या पूर्ण करून आपल्या वयाच्या मुलांपेक्षा आपली शारीरिक क्षमता व खेळा प्रती असलेली जिद्द व चिकाटी याचा सुरेख दाखला दिला.
सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळग्रस्त म्हणून सर्वांना परिचित आहे. अशा दुष्काळी तालुक्यातून श्रीमंत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसे येथील श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी येथे इयत्ता सहावी इयत्तेत मागील वर्षी निखिल याने प्रवेश घेतला.
जन्मतच नैसर्गिक चपळाई लाभलेल्या निखिलची खेळाप्रती आवड व कष्ट करण्याची मानसिकता हेरून प्रशिक्षक आप्पासाहेब तांबे यांनी ट्रायथलॉन या खेळासाठी त्याची तयारी करून घेण्याची सुरुवात केली.
या खेळाबरोबरच निखिलने मागील वर्षी झालेल्या शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत कोल्हापूर विभागामध्ये सुवर्णपदक मिळवले असून नवव्या जिल्हास्तरीय वुशु स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तसेच नेहरू युवा केंद्र बेळगाव यांच्या मान्यतेने आयोजित केलेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काता व कुमिते या दोन क्रीडा प्रकारांमध्ये निखिल याने सुवर्ण व रौप्य पदक मिळवलेले आहे.
अशा हरहुन्नरी निखिलच्या स्वप्नांना मार्गदर्शन करून त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचे कार्य मुख्य प्रशिक्षक आप्पासाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. येत्या काळात ट्रायथलॉन सारख्या क्रीडा प्रकारामध्ये जत पांढरेवाडी सारख्या दुष्काळी पट्ट्यातून उभारी घेऊन आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करून नावलौकिक मिळवेल असे मनोगत संस्थेचे अध्यक्ष गोविंद लांबे यांनी व्यक्त करून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.